चेन्नई : तामिळनाडूच्या तिरुपत्तूर जिल्ह्यात चेन्नई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दोन बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ६० जण जखमी झाले आहेत.
चेन्नईहून बंगळुरूकडे निघालेली स्टेट एक्सप्रेस ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस चेन्नईहून बंगळुरूला जाणाऱ्या ओम्निबसला चेट्टीयप्पनूर येथे पहाटे ४ च्या सुमारास धडकली. धडकेमुळे दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात गुडुवंचेरी येथील रिथिका (३२), वानियामबडी येथील मोहम्मद फिरोज (३७), एसईटीसी बस चालक के. एलुमलाई (४७) आणि चित्तूर येथील बी. अजित (२५) यांचा समावेश आहे. ओम्निबस चालक एन. सय्यद याचा नंतर मृत्यू झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.