
वॉशिंग्टन : अमेरिकेत राहून परदेशात पैसे पाठवणाऱ्यांना आता मोठा धक्का बसणार आहे. कारण अमेरिकेतील ट्रम्प सरकारने अमेरिकेतून विविध देशांमध्ये पैसे पाठवताना ५ टक्के कर लावण्याचे ठरवले आहे. याचा मोठा फटका भारतीयांना बसणार आहे.
अमेरिकेच्या संसदेत ‘द वन बिग ब्युटीफूल बिल’ नावाचे विधेयक सादर झाले. या विधेयकामुळे अमेरिकेतून जगभरात पैसे पाठवणे महाग होणार आहे. कारण या विधेयकानुसार, तुम्ही जर अमेरिकेचे नागरिक नसाल व परदेशात पैसे पाठवत असल्यास तुमच्या रकमेवर थेट ५ टक्के कर अमेरिकन सरकार कापणार आहे.
अमेरिकन संसदेत सादर झालेले नवीन विधेयक ३८९ पानांचे आहे. त्यातील ३२७ क्रमांकाच्या पानावर एक ओळ लिहिली आहे. यात म्हटलेय की, अमेरिकेच्या बाहेर पैसे पाठवणाऱ्यांना ५ टक्के कर लागणार आहे.
हे विधेयक ट्रम्प यांनी का आणले?
रिपब्लिकन नेत्यांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे अमेरिकेला ३.९ ट्रिलियन डॉलरच्या पॅकेजचा खर्च काढण्यास मदत मिळेल. ट्रम्प यांच्या काळात कर कपातीची योजना येण्याची शक्यता आहे. अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन ४ जुलै आहे. तोपर्यंत यावर कायदा बनवण्याचे प्रयत्न केले जातील.