प्रदूषणामुळे ५० टक्के कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’; दिल्ली सरकारचा पुढाकार

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे कोरोना काळातील ‘वर्क फ्रॉम होम’ पुन्हा सुरू झाले आहे. दिल्ली सरकारच्या कार्यालयातील ५० टक्के कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर खासगी कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू करण्याचे आवाहन दिल्ली सरकारने केले आहे.
प्रदूषणामुळे ५० टक्के कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’; दिल्ली सरकारचा पुढाकार
Published on

नवी दिल्ली : दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे कोरोना काळातील ‘वर्क फ्रॉम होम’ पुन्हा सुरू झाले आहे. दिल्ली सरकारच्या कार्यालयातील ५० टक्के कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर खासगी कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू करण्याचे आवाहन दिल्ली सरकारने केले आहे.

दिल्ली सरकारमध्ये १.४ लाख कर्मचारी असून ८० विविध विभाग आहेत. दिल्लीतील आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, अग्निशमन दल, कायदा अंमलबजावणी, वीज पुरवठा, पाणी प्रक्रिया, आपत्कालिन यंत्रणा आदी विभागातील कर्मचाऱ्यांना १०० टक्के कार्यालयात येऊन काम करावे लागणार आहे.

दिल्लीत बुधवारी हवेचा निर्देशांक (एक्यूआय) ४२६ नोंदला गेला. हा धोकादायक पातळीवर समजला जातो. दिल्लीकरांना डोळे चुरचुरणे, श्वास घ्यायला त्रास होणे व अन्य आरोग्याचे त्रास उद‌्भवत आहेत.

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी ‘एक्स’वर सांगितले की, दिल्ली सरकारच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश दिले आहेत. तसेच खासगी कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांसाठी ५० टक्के कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ राबवण्याचे आवाहन केले आहे. तसेच खासगी कंपन्यांनी आपली कार्यालये १०.३० ते ११ वाजता सकाळी सुरू करावीत. त्यामुळे गर्दीच्या काळात वाहनांची वाहतूक कमी होऊ शकेल. कार्यालयांच्या वेळेत बदल केल्याने वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच वाहनांतून प्रदूषण कमी होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

शटल बससेवा सुरू करण्याच्या सूचना

तसेच खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी शटल बस सेवा सुरू करावी. ही सेवा दिल्ली सरकारने सुरू केली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. येत्या काही दिवसात परिस्थितीत सुधारणा होईल, असे राय यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in