घाघरा नदीत सापडले ५३ किलो वजनाचे चांदीचे शिवलिंग

पोलिसांनी हे शिवलिंग ताब्यात घेतले असून ते कुठून आले याचा तपास सुरू केला आहे.
घाघरा नदीत सापडले ५३ किलो वजनाचे चांदीचे शिवलिंग

उत्तर प्रदेशच्या मऊमधील घाघरा नदीत ५३ किलो वजनाचे एक चांदीचे शिवलिंग सापडले असून एका तरुणाला नदीत हे शिवलिंग चकाकताना दिसले. ही बातमी आसपासच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर शिवलिंग पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली. अनेक श्रद्धाळूंनी या शिवलिंगाची पूजा केली. त्यानंतर पोलिसांनी हे शिवलिंग ताब्यात घेतले असून ते कुठून आले याचा तपास सुरू केला आहे.

घाघरा नदीत काही लोकांना चकाकणारी वस्तू दिसली. त्यानंतर ती वस्तू बाहेर काढण्यात आली. तेव्हा ते शिवलिंग असल्याचे आढळून आले. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर शिवलिंग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मलखाना पोलीस ठाण्यात शिवलिंग सन्मानपूर्वक ठेवण्यात आले असून या शिवलिंगाबद्दलचा तपास विशेष यंत्रणांकडून करण्यात येणार आहे.

लोकांसमोरच सराफा व्यावसायिकाला बोलावून या शिवलिंगाचे वजन करण्यात आले असता ते ५३ किलो भरले, असे पोलीस अधीक्षक अविनाश पांडे यांनी सांगितले. हे शिवलिंग नेमके कोणत्या परिसरातील आहे आणि ते घाघरा नदीतून मऊपर्यंत कसे आले, याचा तपास विशेष यंत्रणा करत आहेत. संपूर्ण तपास झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. या शिवलिंगाच्या उगमाबाबत अन्य कोणतीही माहिती समोर न आल्यास जिथे शिवलिंग सापडले, तिथल्या लोकांना ते परत करण्यात येईल; मात्र त्याआधी तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत, अशी माहिती पांडे यांनी दिली.राममिलन निषाद नावाची व्यक्ती घाघरा नदीत स्नान करत होती. पूजा पात्र धुण्यासाठी ते नदीतून वाळू काढत होते. त्यावेळी खाली काहीतरी मोठी वस्तू असल्याचे त्यांना जाणवले. मग त्यांनी तिथे खोदकाम सुरू केले. राममिलन यांनी तिथेच मासेमारी करत असलेल्या रामचंद्र निषाद यांना मदतीसाठी बोलावले. दोघांनी मिळून तिथे खोदकाम केले असता त्यांच्या हाती शिवलिंग आले. यामुळे दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी ते शिवलिंग घरी आणले व जवळच्या मंदिरातील पुजाऱ्याला त्याची माहिती दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in