मुसाब काझी/मुंबई : देशभरात प्राथमिक शाळांची आणि विद्यार्थ्यांची अवस्था दयनीय आहे. पहिली ते पाचवीपर्यंतच्या निम्म्याहून अधिक शिक्षकांकडे योग्य व्यावसायिक पात्रता नाही, तर सुमारे ३० टक्के शिक्षक त्यांचे प्रावीण्य नसलेले विषय शिकवत आहेत, असा निष्कर्ष टाटा सामाजिक विज्ञान (टिस) संस्थेने नुकत्याच केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
टिसने देशभरातील शिक्षकांची स्थिती तपासण्यासाठी एक अभ्यास केला. यात शालेय शिक्षणाच्या इतर पैलूंबरोबरच शिक्षकांची सामाजिक स्थिती, पात्रता आणि वेतन यांचाही विचार केला. गुरुवारी या अभ्यासाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. टिसने आठ राज्यांमध्ये ४२२ शाळा, ३६१५ शिक्षक आणि ४२२ मुख्याध्यापकांचे सर्वेक्षण केले. टिसच्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचर एज्युकेशनद्वारे २०२२ मध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचा अभ्यास केला होता. आता केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे, प्राथमिक शाळांत शिकवणाऱ्या शिक्षकांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता नाही. केवळ ४५.७२ टक्के प्राथमिक शिक्षकांनी डीएड, प्राथमिक शिक्षणातील पदवी किंवा इतर समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. उच्च प्राथमिक आणि माध्यमिक इयत्तांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची परिस्थिती अधिक चांगली आहे. तिथे ५७ टक्के आणि ७९ टक्के शिक्षकांकडे बॅचलर इन एज्युकेशन (बीएड) ही पात्रता पदवी आहे. संशोधकांना असे आढळून आले की, खासगी शाळांची स्थिती चांगली आहे. त्यांनी प्राथमिक इयत्तांसाठी शिक्षणशास्त्राची पदवी घेतलेले शिक्षक जास्त प्रमाणात नेमले आहेत. याउलट, सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये डीएड केलेले ६० टक्के, तर अन्य डीईएएड पात्रता असलेले ६८ टक्के शिक्षक आहेत. सर्वेक्षण अहवालानुसार, सर्व शिक्षकांपैकी ८३ टक्के पदवीधर शिक्षक आहेत. त्यापैकी ९० टक्के शिक्षकांकडे काही प्रकारची व्यावसायिक पात्रता आहे. सरकारी शाळा खासगी शाळांपेक्षा चांगली कामगिरी करतात, असे दिसून आले आहे. व्यावसायिक पात्रता नसलेले बहुसंख्य शिक्षक ग्रामीण भागात कार्यरत आहेत. या अभ्यासाचा आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की, सरकारी आणि खासगी दोन्ही शाळांमधील केवळ ७० टक्के शिक्षक त्यांच्या पदवी अभ्यासक्रमात शिकलेले विषय शिकवत आहेत. गणिताच्या बाबतीत सर्वात मोठी तफावत आढळून आली. ३५ ते ४१ टक्के शिक्षकांकडे पदवीपूर्व स्तरावर गणित हा विषय नव्हता तरीही ते गणित हा विषय शिकवत आहेत. ४ ते ५ टक्के शिक्षक सर्व विषय शिकवत आहेत.
खेळ, कलेला दुय्यम स्थान
या सर्वेक्षणात देशभरातील शाळांमध्ये शारीरिक शिक्षण, कला आणि संगीतासाठी शिक्षकांची तीव्र कमतरता असल्याचेही समोर आले आहे. या आघाडीवर, सरकारी शाळांपेक्षा खासगी शाळांची स्थिती चांगली आहे, तर शहरी भागातील शाळांमध्ये या विषयांसाठी अधिक पूर्णवेळ शिक्षक आहेत. केवळ २९ टक्के शाळांमध्ये अपंग मुलांना शिकवण्यासाठी काही प्रशिक्षण किंवा अभिमुखता असलेले शिक्षक असल्याची नोंद आहे.