5जी मोबाईल सेवा महिन्याभरात सुरु होणार- राज्यमंत्री चौहान

भारतातील दूरसंचार क्षेत्राच्या विकासाची यशोगाथा तपशीलवारपणे सांगताना ते बोलत होते
5जी मोबाईल सेवा महिन्याभरात सुरु होणार- राज्यमंत्री चौहान

केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान म्हणाले, “भारतीय दूरसंचार सेवांचे जाळे आज सर्वात किफायतशीर दरांसह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे जाळे झाले आहे. केंद्र सरकारच्या बाजारस्नेही धोरणांमुळे ह्या वाढीला प्रोत्साहन मिळाले.” भारतातील दूरसंचार क्षेत्राच्या विकासाची यशोगाथा तपशीलवारपणे सांगताना ते बोलत होते. आयटीयू अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या आशिया तसेच महासागर प्रदेशासाठी स्थापन करण्यात आलेल्या आरएसएफचे म्हणजेच प्रादेशिक प्रमाणीकरण मंचाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. तसेच 5जी मोबाईल सेवा महिन्याभरात सुरु होईल, असेही राज्यमंत्री चौहान यांनी सांगितले.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलेली भारतीय दूरसंचार क्षेत्रातील धोरणे उद्योगांसाठी “व्यवसाय करण्यातील सुलभता”, देशाच्या ग्रामीण भागात तसेच अत्यंत दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसह सर्व नागरिकांसाठी “जीवन जगण्यातील सुलभता” आणि स्वावलंबी भारतासाठी “आत्मनिर्भर भारत” या तीन स्तंभांवर आधारित आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहोळ्याचा भाग म्हणून केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या आशिया तसेच महासागर प्रदेशासाठी स्थापन करण्यात आलेल्या आरएसएफचे म्हणजेच प्रादेशिक प्रमाणीकरण मंचाचे आयोजन केले आहे. आशिया आणि महासागर प्रदेशातील २० देशांच्या सहभागासह होत असलेल्या या संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आज केंद्रीय राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांच्या हस्ते झाले. यावेळी भारत सरकारमधील अनेक मान्यवरांसह, आयटीयूच्या अभ्यासगट विभागाचे प्रमुख, बिलेल जामौसी तसेच आयटीयूच्या हिंद-प्रशांत प्रादेशिक कार्यालयाचे प्रदेश संचालक अत्सुको ओकुदा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

“दूरसंचार/ माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान विभागाचे नियामकीय आणि धोरणात्मक पैलू” ही या प्रादेशिक प्रमाणीकरण मंचाची मध्यवर्ती संकल्पना होती. ९ ऑगस्ट ते १२ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीत आंतराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या टी अभ्यासगट ३ या आशिया तसेच महासागरी प्रदेशासाठीच्या गटाच्या बैठका होणार आहेत.

भारतातील दूरसंचार क्षेत्रातील सुधारणांमुळे निर्माण झालेल्या सकारात्मक आणि प्रगतीशील वातावरणाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले की देशातील सुमारे १,७५,००० गावांपर्यंत ऑप्टिकल फायबर पोहोचविण्याचे काम पूर्ण झाले असून ५,६०,००० गावांना ४ जी मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in