हल्द्वानी हिंसाचारात ६ ठार, ६० जखमी; मदरसा पाडण्यावरून उत्तराखंडमध्ये तणाव: संचारबंदी लागू

नैनितालच्या जिल्हाधिकारी वंदना सिंह आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रल्हाद मीना यांनी येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
हल्द्वानी हिंसाचारात ६ ठार, ६० जखमी; मदरसा पाडण्यावरून उत्तराखंडमध्ये तणाव: संचारबंदी लागू

हल्द्वानी (उत्तराखंड) : उत्तराखंडमधील हल्द्वानी शहरात बेकायदेशीरपणे बांधलेल्या मदरसा व त्याच्या आवारातील नमाजाची जागा पाडण्यावरून झालेल्या हिंसाचारात ६ जण ठार आणि तीन गंभीर जखमी झाले आहेत. ६० जखमींना विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले आहे, असे पोलीस अधीक्षक हरबन्स सिंग यांनी सांगितले. तर या ठिकाणी संचारबंदी लागू केली असून दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

नैनितालच्या जिल्हाधिकारी वंदना सिंह आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रल्हाद मीना यांनी येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यांनी गुरुवारी भडकलेल्या हिंसाचारात दोघांच्या मृत्यूची पुष्टी केली. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शुक्रवारी डेहराडून येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेतली आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था ए. पी. अंशुमन यांना शांतता आणि कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी हल्द्वानी येथे तळ ठोकण्याच्या सूचना दिल्या. शहरातील बनभूलपुरा परिसरातील बेकायदा बांधकाम हटवताना पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर झालेला हल्ला आणि परिसरात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न झाल्याची तीव्र दखल घेत मुख्यमंत्र्यांनी बेकायदा घटकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. जाळपोळ आणि दगडफेकीत सामील असलेल्या प्रत्येक दंगलखोराची ओळख पटली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी हल्द्वानी येथे भेट देऊन स्थितीची माहिती घेतली व पोलीस कर्मचाऱ्यांवर केलेले हल्ला हा नियोजनबद्ध असल्याचे सांगितले. दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी हिंसाचारासाठी भाजपने निर्माण केलेल्या ध्रुवीकरणाला जबाबदार धरले. जेव्हा केवळ ध्रुवीकरणाचा हेतू असतो, तेव्हा असे घडते. कर्फ्यू लादला जातो, मणिपूरमधील घटना पहा. प्रत्येक राज्यात भाजपने ध्रुवीकरणाचा फायदा होईल अशी परिस्थिती निर्माण केली आहे, असे त्यांनी सांगितले.

रासुका अंतर्गत कारवाई करणार

उत्तराखंडचे डीजीपी अभिनव कुमार यांनी शुक्रवारी सांगितले की, ज्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि हल्द्वानीमध्ये जाळपोळ आणि तोडफोड केली, त्यांच्याविरुद्ध कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ए. पी. अंशुमन यांनी हल्द्वानी या हिंसाचारग्रस्त शहराला भेट दिली.

logo
marathi.freepressjournal.in