८ माजी नौदल अधिकाऱ्यांची कतारमधून सुटका, सात जण घरी परतले : भारताच्या कूटनीतीला यश

हेरगिरीच्या आरोपाखाली कतारमध्ये शिक्षा झालेल्या भारतीय नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांची सुटका झाली असून त्यापैकी सात जण सोमवारी पहाटे भारतात परतले आहेत.
८ माजी नौदल अधिकाऱ्यांची कतारमधून सुटका, सात जण घरी परतले : भारताच्या कूटनीतीला यश

नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपाखाली कतारमध्ये शिक्षा झालेल्या भारतीय नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांची सुटका झाली असून त्यापैकी सात जण सोमवारी पहाटे भारतात परतले आहेत. आठवा अधिकारीही लवकरच स्वगृही परतणार आहे. कतारमध्ये फाशीची शिक्षा झाली असूनही ती रद्द करून या ८ जणांना सोडवल्यामुळे भारतीय कूटनीतीला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि सेलर रागेश अशी सुटका झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यापैकी कमांडर पूर्णेंदू तिवारी वगळता अन्य ७ जण रविवारी रात्री कतारमधून विमानाने निघून सोमवारी पहाटे भारतात परतले आहेत. कमांडर पूर्णेंदू तिवारी यांना विलंब लागण्याचे कारण स्पष्ट करण्यात आले नसले तरी तेदेखील लवकरच परततील, असे सांगण्यात येत आहे. या सर्वांच्या सुटकेबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी सरकारचे आभार मानले आहेत. भारताने त्यांच्या सुटकेचे स्वागत केले आहे.

दाहरा ग्लोबल या कंपनीसाठी कतारमध्ये काम करत असताना त्यांना ऑगस्ट २०२२ मध्ये इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झाली होती. तेव्हापासून १८ महिने हे आठ जण कतारच्या कैदेत होते. तेथील न्यायालयाने ्यांना २६ ऑक्टोबर २०२३ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे भारतात चिंता व्यक्त केली जात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांची गतवर्षी दुबई येथे भरलेल्या जागतिक हवामानविषयक शिखर परिषदेत भेट झाली. त्यावेळी मोदी यांनी केलेल्या शिष्टाईला यश आले आणि डिसेंबर २०२३ मध्ये कतारने या ८ जणांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना वेगवेगळ्या मुदतीची कैद सुनावली. त्यानंतर भारतीय परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाटाघाटी करून त्यांची जन्मठेपेची शिक्षाही रद्द करवून घेतली. अखेर अमीर अल-थानी यांनी या आठही जणांच्या सुटकेला होकार दिला.

इस्रायलसाठी हेरगिरीचा आरोप

कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि सेलर रागेश हे आठ जण भारतीय नौदलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर दाहरा ग्लोबल नावाच्या कंपनीसाठी कतारमध्ये काम करत होते. कतारच्या नौदलाने इटलीकडून यू-२१२ प्रकारची स्टेल्थ पाणबुडी घेतली होती. ती पाणबुडी कतारच्या नौदलात सामील करून घेणे आणि त्याबाबत कतारच्या नौदल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, हे काम या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आले होते. मात्र, या ८ जणांनी प्रकल्पाची गुप्त माहिती इस्रायलला पुरवल्याचा आरोप करून कतारने त्यांना ऑगस्ट २०२२ मध्ये अटक केली होती.

logo
marathi.freepressjournal.in