भारतातील गणित शिक्षकांचीच गणिताची बोंब; नवीन सर्वेक्षणात माहिती उघड

गणित विषय बहुतांशी विद्यार्थ्यांना कठीण जातो. भागाकार, गुणाकार, लसावी, मसावी आदींमुळे विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडते. आता नवीन सर्वेक्षणानुसार...
भारतातील गणित शिक्षकांचीच गणिताची बोंब; नवीन सर्वेक्षणात माहिती उघड
(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : गणित विषय बहुतांशी विद्यार्थ्यांना कठीण जातो. भागाकार, गुणाकार, लसावी, मसावी आदींमुळे विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडते. आता नवीन सर्वेक्षणानुसार, भारत व मध्य-पूर्वेतील ८० टक्के गणित शिक्षकांची गणिताचीच बोंब असल्याचे एका सर्वेक्षणात उघड झाले आहे. या शिक्षकांना गुणोत्तर, अनुपातिक तर्क, बीजगणित, अंदाज आणि तार्किकता या मूळ संकल्पनाच माहिती नसल्याचे समोर आले आहे.

भारत, यूएई, ओमान व सौदी अरेबियातील १५२ शाळांतील १३०० शिक्षकांचे मूल्यांकन करण्यात आले.

‘गणिताच्या शिक्षकांचे ज्ञान व प्राथमिक व मध्यम श्रेणी गणिताच्या संकल्पातील गैरसमज’ असे या अभ्यासाचे नाव आहे. शिक्षक प्रभाव कार्यक्रमांतर्गत १,३५७ शिक्षकांचे गणित विषय ज्ञान-स्तर १ मूल्यांकन हाती घेण्यात आले. यातून शिक्षकांचे विषय, शैक्षणिक ज्ञान, परीक्षार्थी आणि शाळेच्या मुख्याध्यापकांसह अन्य तपशील उघड झाला आहे. यात भारतातील ८० टक्के, यूएईतील १८ टक्के, ओमान व सौदी अरेबियातील १ टक्के शिक्षकांचे मूल्यमापन करण्यात आले.

विशेष म्हणजे गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील ५० टक्के प्रश्नांची उत्तरे देताना ७५ टक्के शिक्षकांना घाम फुटला, तर केवळ २५ टक्के शिक्षकांना हे प्रश्न सोडवता आले. ८० टक्के शिक्षकांना गणिताच्या मूलभूत संकल्पनाच स्पष्ट नसल्याचे उघड झाले. या संकल्पनामुळे दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडवण्यास मदत मिळत असते. गणिताच्या संकल्पना शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये स्पष्ट न झाल्यास गणित शिक्षणाबाबत मोठे आव्हान उभे राहू शकते, असे अहवालात नमूद केले आहे.

भूमितीच्या संकल्पनांमध्येही शिक्षकांमध्ये गैरसमज आढळले आहेत. त्यात ३२.९ टक्के शिक्षकांचा चुकीचा विश्वास होता की, भाग जोडून तयार केलेल्या ‘आकाराची परिमिती’ ही त्या भागांच्या परिमितीची बेरीज असते, जे मूलभूत भौमितीय गुणधर्मांच्या आकलनाचा अभाव दर्शवते. या सर्वेक्षणामुळे भारताच्या शैक्षणिक यंत्रणेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शैक्षणिक गैरसमजामुळे पिढ्यान‌् पिढ्यांकडे चुकीच्या संकल्पना जात आहेत.

‘पिसा’तर्फे शिक्षकांचे मूल्यमापन केले जाते. त्यात भारताला ७३ पैकी ७२ वा क्रमांक मिळाला आहे. विद्यार्थी संकल्पनेपेक्षा केवळ पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करतात, असे कंपनीचे सहसंस्थापक श्रीधर राजगोपालन यांनी सांगितले.

दरम्यान, ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०’च्या माध्यमातून शाळा व शिक्षकांसाठी सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in