मध्य प्रदेशात भिंत कोसळून ९ मुले ठार

मध्य प्रदेशाच्या सागर जिल्ह्यात रविवारी मोडकळीस आलेल्या एका घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ मुले ठार झाली, तर अन्य दोन जण जखमी झाल्याचे अधिकऱ्यांनी सांगितले.
मध्य प्रदेशात भिंत कोसळून ९ मुले ठार
Published on

सागर (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशाच्या सागर जिल्ह्यात रविवारी मोडकळीस आलेल्या एका घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ मुले ठार झाली, तर अन्य दोन जण जखमी झाल्याचे अधिकऱ्यांनी सांगितले.

रेहल विधानसभा मतदारसंघातील शाहपूर गावात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना एका मंदिराच्या संकुलाजवळील घराची भिंत कोसळली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या दुर्घटनेत १० ते १५ वर्षे वयोगटातील नऊ मुले ठार झाली असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेचे वृत्त कळताच जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य ज्येष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.

या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांचे आर्थिक साह्य देण्याचे जाहीर केले आहे. मोडकळीस आलेल्या इमारतीच्या खाली असलेल्या एका तंबूमध्ये पार्थिव शिवलिंग निर्माण कार्यक्रम सुरू असताना भिंत तंबूवर कोसळली, असे भाजपचे स्थानिक आमदार गोपाळ भार्गव यांनी सांगितले. तंबू आणि दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली ही मुले चिरडली गेली, असेही ते म्हणाले.

ही मुले तंबूमध्ये बसली होती आणि पावसामुळे घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. त्यामध्ये दोन मुले जागीच ठार झाली, तर अन्य मुलांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

रेवा जिल्ह्यातही घराची भिंत कोसळली, ४ मुले ठार

रेवा जिल्ह्यात घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जण ठार झाले. त्याप्रकरणी पोलिसांनी इमारतीच्या दोन मालकांना अटक केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुर्घटनेत ठार झालेली पाच ते सात वर्षे वयोगटातील मुले शनिवारी शाळेतून घरी परतत असताना मोडकळीस आलेल्या इमारतीची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. पोलिसांनी रमेश नामदेव आणि सतीश नामदेव या इमारतीच्या दोन मालकांना शनिवारी रात्री अटक केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in