
पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत एलपीजी सिलिंडर घेणाऱ्या ९० लाख लाभार्थींनी पुन्हा सिलिंडर भरलेच नाहीत, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तर या योजनेच्या एक कोटी लाभार्थींनी कनेक्शन घेतल्यानंतर वर्षात एकदाच सिलिंडर भरले आहे.
आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी इंडियन ऑईल, बीपीसीएल व एचपीसीएल आदी कंपन्यांना
माहिती अधिकारात प्रश्न विचारले हेाते. उज्ज्वला योजना पंतप्रधान मोदी यांनी १ मे २०१६ रोजी बलिया येथे सुरू केली. २०२० पर्यंत ८ कोटी एलपीजी देण्याचे लक्ष्य ठरवले होते. सरकारने ९ कोटी कनेक्शन दिले.
२०२१-२२ मध्ये उज्ज्वला योजना २.० सुरू केली. इंडियन ऑईलने सांगितले की, ६५ लाख ग्राहकांनी त्यांचे सिलिंडर गेल्या वर्षभरात भरले नाहीत. तर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या ९.१ लाख तर भारत पेट्रोलियमच्या १५.९६ लाख ग्राहकांनी सिलिंडर भरले नाहीत. भारत पेट्रोलियमने सांगितले की, हा आकडा सप्टेंबर २०१९ पर्यंत उज्ज्वला योजनेच्या पहिल्या टप्प्यातील आहे.
गेल्या आर्थिक वर्षात इंडियन ऑईलच्या ५२ लाख ग्राहकांनी एक वर्षात एकदाच, एचपीसीएलच्या २७.५८ लाख तर बीपीसीएलच्या २८.५६ लाख ग्राहकांनी एकदाच सिलिंडर भरला आहे.