हैदराबादमध्ये भिकाऱ्यांची कमाई दरमहा दोन लाख

पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
हैदराबादमध्ये भिकाऱ्यांची कमाई दरमहा दोन लाख

हैदराबाद : आपण भिकारी दिसल्यावर त्याची दया येऊन सहजपणे त्यांच्या हातावर पैसे ठेवतो. पण, आता भिकारीच आपल्यापेक्षा श्रीमंत असल्याचे उघड होत आहे. हैदराबाद येथे शहरातील ट्रॅफिक जंक्शनवर भीक मागणाऱ्या कुटुंबाची महिन्याची कमाई १.५ ते २ लाख रुपये असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी शहरातील भिकाऱ्यांचे रॅकेट उद‌्ध्वस्त केले असून, २३ जणांची सुटका केली आहे. पोलिसांनी ‘भिकारी माफियां’ना ताब्यात घेतले असून, हे भिकारी हैदराबाद, सायबराबाद व राचकोंडा येथील ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागत होते.

हैदराबादच्या आयुक्तांच्या कृती दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पती, पत्नी, ४ ते ५ मुले व म्हातारे असे सर्व कुटुंबीय एका ट्रॅफिक जंक्शनचा ताबा घेतात. हे लोक दुसऱ्यांदा भीक मागायला देत नाहीत. त्यांची रोजची कमाई ४ ते ७ हजार आहे. विशेष म्हणजे यांची हद्द ठरली असून, त्यात वाद झाल्यास त्यांच्यातील ज्येष्ठ व्यक्ती त्यात हस्तक्षेप करते. तसेच भीक मागण्याच्या वेगवेगळ्या वेळा किंवा ट्रॅफिक सिग्नलच्या पॉइंटची विभागणी करून समाधान केले जाते.

पैसे व्याजाने देण्याचा व्यवसाय

हे भिकारी कुटुंबीयांसह रिक्षातून येतात. ते पूर्ण दिवस ट्रॅफिकवर जंक्शनवर राहतात. सायंकाळी रिक्षातून ते घरी जातात. यातील काही भिकारी हे पैसे उधार देण्याचा व्यवसाय करतात. घरी जाताना दारू व बिर्याणी ते घेऊन जातात. या क्षेत्रातील कमाई पाहून संघटित माफियांनी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. हे लोक दिव्यांग, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांना भिकारी म्हणून बसवतात. दिवसभरानंतर ते या लोकांना २०० रुपये देतात.

भिकाऱ्यांच्या माफियाला अटक

भिकारी माफिया अनिल पवार याला कर्नाटकातील गुलबर्गा येथून पोलिसांनी अटक केली. त्याचे साथीदार फरार आहेत. अनिल पवार व त्याचे साथीदारांचे नेटवर्क ताडबून ते हायटेक सिटीपर्यंत त्यांचे जाळे पसरले आहे. हे लोक आपल्या समाजातील गरीब महिला, अल्पवयीन मुले, विधवा व शारीरिक दिव्यांगांचे शोषण करत होते.

लहान मुलांना अमली पदार्थ देतात

अनिल पवार हा लहान मुलांना अमली पदार्थ देत होता. त्यानंतर ही मुले भीक मागतात. भिकाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी ८ दुचाकींचा वापर केला जात होता. त्या जप्त केल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in