मुंबई-गोवा महामार्गावर पुस्तक लिहिता येईल

नितीन गडकरी : या महामार्गाबाबत मन अपराधी होते
मुंबई-गोवा महामार्गावर पुस्तक लिहिता येईल

नवी दिल्ली : राज्यसभेत रखडलेल्या रस्त्यांबाबत प्रश्नाला उत्तर देतांना गडकरी म्हणाले की याचे उत्तर देतांना मलाही अपराध केल्यासारखे वाटत आहे. मुंबर्इ-गोवा आणि सिधी-सिंगरौली या रस्त्यांबाबत पुस्तक लिहिता येर्इल, अशा शब्दात गडकरी यांनी आपला खेद व्यक्त केला. देशातील हे दोन्ही रस्ते अनेक वर्षे रखडले आहेत. याबाबत राज्यसभेत भाजप खासदार अजय प्रताप यांनी नितीन गडकरी यांचे त्यांनी रस्ते विकास क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल प्रथम तोंडभरुन कौतुक केले. नंतर संपूर्ण देशात गडकरींची ख्याती आहे पण सिधी-सिंगरौली रस्त्याबाबत जनतेची निराशा झाली आहे, असा टोला लगावला. यानंतर गडकरी यांनी मुंबर्इ-गोवा रस्त्याचाही उल्लेख करीत खंत व्यक्त केली.

त्यानंतर गडकरी यांनी या रखडलेल्या रस्त्यांची कहाणी सांगितली, ‘‘यापूर्वी सिधी-सिंगरौलीचे काम रखडले असताना कोल इंडियाकडे पैसे मागून हा रस्ता केल्याची चर्चा होती. यावर कोल इंडियाचे प्रस्ताव आले, हे दुर्दैवी आहे. याचे माझ्याकडे काहीच उत्तर नाही. रस्ता बांधणारा पहिला पक्ष अपयशी ठरला. त्यानंतर ते एनसीएलटीमध्ये गेले. ते संपुष्टात आल्यावर न्यायालयात गेले. न्यायालयाने स्थगिती दिल्याने हा निवाडा होऊ शकला नाही. दुसऱ्या पक्षाला दिल्यावर त्याचे फारसे काही झाले नाही. आता प्रक्रिया अशी आहे की त्याने काम केले नाही तरी त्याला नोटीस आणि वेळ द्यावा लागतो. तो कोर्टात जातो. ही प्रक्रिया आहे. हे केल्याशिवाय काही करता येत नाही. त्यांना खूप त्रास होतो, हे वास्तव आहे.’’

दरम्यान, राज्यसभेत विचारण्यात आलेल्या या प्रश्नावर सभापती जगदीप धनखड यांनाही हसू आले. गडकरींच्या वाहतूक क्षेत्रातील कामाचेही त्यांनी कौतुक केले. हसत हसत ते म्हणाले की, केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरही गडकरींच्या कामाचे कौतुक होत आहे.’’

logo
marathi.freepressjournal.in