Budget 2024: भारताला समृद्ध करणारे बजेट -पंतप्रधान

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला. हा अर्थसंकल्प देशाला समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाणारा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदीFPJ
Published on

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला. हा अर्थसंकल्प देशाला समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाणारा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

“अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांची काळजी घेण्यात आली आहे. समाजातील सर्व वर्गांसाठी शक्ती देणारा हा बजेट आहे. गावातील गरीब शेतकऱ्याला समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाणार हा बजेट आहे. तरुणांना अगणित संधी देणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गाला नवे बळ मिळणार आहे. यामध्ये आदिवासी समाज, दलित आणि मागासलेल्या लोकांच्या सक्षमीकरणासाठी भक्कम योजना आहेत. या अर्थसंकल्पामुळे महिलांचा आर्थिक सहभाग सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे,” असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

“हा अर्थसंकल्प व्यापारी आणि लघु उद्योगांना प्रगतीचा नवा मार्ग देईल. अर्थसंकल्पात उत्पादन आणि पायाभूत सुविधांवरही भर देण्यात आला आहे. पीएलआय योजनेचे यश जगाने पाहिले आहे. यामध्ये सरकारने एक सघन योजना जाहीर केली आहे, ज्यामुळे देशात कोट्यवधी रोजगार निर्माण होतील. आमचे सरकार पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना पहिला पगार देणार आहे. यामुळे गरीब गावातील तरुण मुले-मुली देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम करतील. एक कोटी तरुणांसाठी इंटर्नशिप योजनाची घोषणा करण्यात आली आहे,” असेही पंतप्रधानांनी सांगितले.

“आपल्याला प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात उद्योजक घडवायचे आहेत. मुद्रा कर्जाची मर्यादा १० लाख रुपयांवरून २० लाख रुपये केली आहे. याचा फायदा मागासवर्गीय, दलित आणि आदिवासींना होणार आहे. आपण सर्व मिळून देशाला औद्योगिक केंद्र बनवू. देशातील एमएसएमई क्षेत्र हे देशाचे केंद्र बनले आहे.”

हा तर खुर्ची बचाव बजेट - राहुल गांधी

विरोधी पक्षांनीही अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीही अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. हा खुर्ची बचाव बजेट… आहे. सरकारमधील मित्रपक्षांना खूश करणारा हा अर्थसंकल्प आहे. बजेटमध्ये इतर राज्यांच्या तोंडाला पाने पुसत मित्रपक्षांना पोकळ आश्वासने दिले गेली आहेत,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

“हा अर्थसंकल्प मित्रपक्षांना खुश करण्यासाठी आणण्यासाठी आला आहे. अर्थसंकल्पातून अदानी, अंबानींचा फायदा होईल आणि सामान्य नागरिकांना कोणताही दिलासा मिळणार नाही. हा कॉपी पेस्ट बजेट आहे. हा बजेट काँग्रेसचा जाहीरनामा आणि मागच्या जाहीरनाम्याची कॉपी आहे,” असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in