
नवी दिल्ली : एकाच आर्थिक वर्षात बँकेतील मुदत ठेव, बचत खाते, शेअर खरेदी, म्युच्युअल फंड गुंतवणूक तसेच ऋणपत्रे आणि रोखे खरेदी याबाबतच्या दहा लाखांवरील व्यवहारांवर पाळत ठेवा, असा आदेश आयकर विभागाने आपल्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
तसेच एकाच वेळी एक लाखावरील क्रेडिट कार्ड बिल पेमेंट व मालमत्ता निबंधकांकडे रोखीतून मोठा व्यवहार या अन्य दोन व्यवहारांची संबंधित संस्थांनी त्वरित आयकर विभागाला माहिती द्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. एखादी व्यक्ती ३० लाखांपेक्षा अधिक किमतीचा व्यवहार रोखीने करीत असेल तर निबंधकांनी त्वरित आयकर विभागाला कळवावे, असेही सूचित करण्यात आले आहे. आयकर कार्यालयांना अशा संबंधित पक्षकारांना नोटिसा बजावण्याचे आदेश सोडण्यात आले आहेत. रोखीने व्यवहार करणाऱ्यांकडून पैशाचे स्त्रोत जाणून घ्यावेत, असेही आयकर विभागाने सांगितले आहे.