बर्लिन : जगात सध्या पाच दिवसांचा आठवडा आहे. बहुतांश बड्या कंपन्यांमध्ये पाच दिवस काम करून कर्मचाऱ्यांना दोन दिवस सुट्टी दिली जाते. आता अनेक देशात आठवड्यातून चार दिवस कामाचा आठवडा सुरू झाला आहे. अनेक देशांमध्ये याचा अवलंबही केला जात आहे. आता जर्मनीतील अनेक कंपन्यांनी आठवड्यातून ४ दिवस कामाचा आठवडा लागू केला आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून बदल लागू केला जाईल.
जर्मनीतील अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त चार दिवस कामाची सुविधा देत आहेत. या अंतर्गत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील सात दिवसांपैकी फक्त ४ दिवस काम करण्यास सांगत आहेत. उर्वरित ३ दिवस कर्मचाऱ्यांना विश्रांती देण्यात येत आहे. विशेष म्हणजे यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणतीही कपात केली जाणार नाही. जर्मनीतील अनेक कंपन्या याबाबत चाचणी घेत आहेत. या प्रयोगात सुमारे ४५ कंपन्या सहभागी झाल्या आहेत. यामध्ये सहभागी कंपन्या पगारात कोणताही बदल न करता कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी करत आहेत. यापूर्वी २०२२ मध्ये ब्रिटनमधील अनेक कंपन्यांनी असाच प्रयोग केला होता.
कंपन्यांच्या या अडचणी दूर होतील
जर्मनी सध्या आर्थिक आघाडीवर संघर्ष करत आहे. युरोपची सर्वात मोठी अर्थव्यवस्था गेल्या वर्षी आर्थिक मंदीत सापडली. तेव्हापासून अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी जर्मनीची धडपड सुरू झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही कंपन्यांना अडचणी येत आहेत. कंपन्यांसमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे कर्मचाऱ्यांची कमतरता. असे मानले जात आहे की, ४ दिवस कामामुळे कंपन्यांच्या विद्यमान कर्मचाऱ्यांची उत्पादकता तर वाढेलच, परंतु कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची समस्या देखील दूर होईल.