भूतबाधेतून मुक्त करण्यासाठी मुलीला केली मरेपर्यंत मारहाण

शुक्रवार आणि शनिवारी रात्री पालकांनी काळ्या जादूच्या नावाखाली मुलीला मारहाण केली होती.
भूतबाधेतून मुक्त करण्यासाठी मुलीला केली मरेपर्यंत मारहाण

नागपुरात भूतबाधेतून मुक्त करण्यासाठी आई-वडिलांनी केलेल्या मारहाणीत पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवार आणि शनिवारी रात्री पालकांनी काळ्या जादूच्या नावाखाली मुलीला मारहाण केली होती. पोलिसांनी मुलीचे वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना आणि मावशी प्रिया बनसोड यांना अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यूट्यूबवर स्थानिक वृत्तवाहिनी चालवणारा सिद्धार्थ चिमणे गेल्या महिन्यात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपली पत्नी आणि दोन मुलींना घेऊन दर्ग्यात गेला होता.तेव्हापासून आपल्या लहान मुलीच्या वागण्यात बदल झाल्याचा संशय त्याला येत होता. आपल्या मुलीला भूतबाधा झाली असून, ती घालवण्यासाठी काळी जादू करण्याचे त्याने ठरवले होते.

मुलीच्या आई, वडील आणि मावशीने मिळून काळी जादू केली आणि हा सगळा प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला. पोलिसांनी मोबाइलमधून हा व्हिडीओ मिळवला आहे. या व्हिडीओत आरोपी वडील रडणाऱ्या आपल्या मुलीला काही प्रश्न विचारत असल्याचे दिसत आहे. प्रश्न समजत नसल्याने मुलगी काहीच उत्तर देत नव्हती, असे पोलिसांनी सांगितले आहे.

काळी जादू करताना तिघांनीही मुलीला अनेकदा मारहाण केली. यानंतर मुलगी बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळली, असे पोलिसांनी सांगितले आहे. यानंतर आरोपीने मुलीला शनिवारी सकाळी दर्ग्यात नेले. नंतर तिला सरकारी रुग्णालयात दाखल करून तिघांनी पळ काढला. रुग्णालयाच्या गेटवर असणाऱ्या सुरक्षारक्षकाला संशय आल्याने त्याने गाडीचा फोटो काढला होता. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित करून पोलिसांना कळवले. गाडीच्या नंबर प्लेटवरून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि बेड्या ठोकल्या.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in