तिरुपती देवस्थानकडे १४ टन सोने

देश-विदेशांतून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात
तिरुपती देवस्थानकडे १४ टन सोने
Published on

देशातीलच नव्हे तर जगातील श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या तिरुपती बालाजी देवस्थान प्रशासनाने नुकतीच आपली संपत्ती आणि मालमत्ता जाहीर केली आहे. तिरुपती देवस्थानच्या देशभरात ९६० मालमत्ता आहेत. त्यांची किंमत ८५,७०५ कोटी रुपये आहे. तिरुपती बालाजी देवस्थानाची विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये १४ हजार कोटींहून अधिक रुपयांच्या ठेवी आहेत, तर १४ टन सोन्याचा साठा देवस्थानाकडे असल्याचे तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय. वी. सुब्बारेडी यांनी सांगितले.

देश-विदेशांतून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या भाविकांकडून मंदिराला मोठ्या प्रमाणात देगण्या मिळतात. त्यामुळे मंदिराच्या संपत्तीची नेहमीच चर्चा असते. त्यात आता मंदिर प्रशासनाने आपली संपत्ती आणि मालमत्ता जाहीर केली आहे. १९७४ ते २०१४ सालादरम्यान वेगवेगळ्या सरकारच्या अंतर्गत मंदिर समितीने ११३ मालमत्ता निकाली काढल्या आहेत; मात्र २०१४ नंतर एकाही मालमत्तेची विक्री केली नाही.

व्याजातून मिळते १०० किलो सोने

दान मिळण्यात तिरुपती बालाजी जगात पहिल्या क्रमांकाचे देवस्थान आहे. देवस्थानला महिन्याला सरासरी २०० कोटी रुपये दान स्वरुपात मिळतात. देवस्थानच्या ठेवी इतक्या आहेत की त्याच्या केवळ व्याजातून वर्षाकाठी १०० किलो सोने मिळते.

मालमत्तेची श्वेतपत्रिका संकेतस्थळावर

“राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करून मागील विश्वस्त मंडळाने दरवर्षी संपत्ती आणि मालमत्तेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याचा संकल्प केला होता. त्याप्रमाणे २०२१ साली पहिली, तर यंदा दुसरी श्वेतपत्रिका काढण्यात आली आहे. दोन्ही श्वेतपत्रिका तिरुपती देवस्थानच्या संकेतस्थळावर टाकण्यात आल्या आहेत. भाविकांना पारदर्शी कारभार आणि देवस्थानाच्या संपत्तीचे जतन करण्याचे वचन देतो.”

- सुब्बा रेड्डी, चेअरमन,

तिरुपती मंदिर

logo
marathi.freepressjournal.in