आधुनिक वास्तुकलेतील चमत्कार आहे रामलल्लाचे मंदिर

मंदिरात एकूण पाच मंडप आहेत. त्यांची नावे नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप अशी आहेत.
आधुनिक वास्तुकलेतील चमत्कार आहे रामलल्लाचे मंदिर

अयोध्या : अयोध्येत बांधण्यात आलेले श्रीरामाचे मंदिर भारतासाठी वास्तुकला आणि अध्यात्म यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. सोमवारी अनावरण करून अयोध्येच्या क्षितिजावर उदय पावलेले हे मंदिर श्रीरामाच्या चरणी अर्पण केलेल्या कलेचा उत्कृष्ट नमुना आहे, असे उद्गार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी काढले आहेत.

चंपत राय म्हणाले की, देशातील सर्वात बुद्धिमान व्यक्तींच्या सामूहिक बुद्धिमत्तेतून निर्माण झालेली ही वास्तू आहे. या वास्तूमध्ये लोखंडाचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही. मंदिरासाठीचा दगड राजस्थानच्या बन्सी पहारपूर येथून मागवण्यात आला आहे. संपूर्ण मंदिर तीन ग्राऊंड प्लस २ असे तीन थरात योजण्यात आले आहे. मुख्य मंदिरात पोहोचण्यासाठी भाविकांना पूर्वेच्या बाजूला ३२ पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. मंदिर पारंपरिक नगारा शैलीत बांधण्यात आले असून ते ३८० फूट लांब आणि २५० फूट रुंद व १६१ फूट उंच आहे. मंदिराचा प्रत्येक मजला २० फूट उंच आहे. मंदिराला एकूण ३९२ खांब आणि ४४ द्वार आहेत. मंदिराचे खांब आणि भिंती यांच्यावर हिंदू देव, देवी, देवतांच्या प्रतिमांचे कोरीव काम आहे. मुख्य गाभारा तळमजल्यावर आहे. तेथे रामलल्ला विराजमान आहेत. मंदिराचे मुख्य द्वार पूर्वेला असून ३२ पायऱ्या चढून तेथे प्रवेश करता येतो.

मंदिरात एकूण पाच मंडप आहेत. त्यांची नावे नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप अशी आहेत. मंदिराच्या जवळच ऐतिहासिक विहीर असून तिचे नाव सीता कूप असे आहे. ती पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. मंदिराच्या नैऋत्य भागात कुबेर टिला, भगवान शिव यांचे पुरातन मंदिर असून त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. तसेच याच ठिकाणी जटायूचा पुतळा देखील उभारण्यात आला आहे. मंदिराचा पाया १४ मीटर जाड काँक्रीटच्या थराने बांधण्यात आला आहे. जणू कृत्रिम खडकच तयार करण्यात आला आहे. मंदिराच्या पायाला ओलाव्यापासून दूर ठेवण्यासाठी २१ फूट उंच प्लिंथ ग्रॅनार्इटच्या सहाय्याने बांधण्यात आला आहे. मंदिराच्या परिसरात जलसिंचन केंद्र, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, सुरक्षिततेसाठी पाणीपुरवठा आणि स्वतंत्र वीज केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. संपूर्ण मंदिर पारंपरिक भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करूनच उभारण्यात आले आहे.

मंदिराचा संपूर्ण परिसर ७० एकरमध्ये असून त्यातील ७० टक्के भाग हरित ठेवण्यात आला आहे. सुमारे ६०० झाडे वाचवून जतन करण्यात आली आहेत. मंदिरासाठी खोदकाम करताना तेथील जमीन भुसभुशीत असल्याचे आढळले होते. म्हणून काँक्रीटचे कृत्रिम फाऊंडेशन तयार करण्यात आले आहे. त्यावर भगवान हनुमानासह अन्य देवता, मयुर, विविध प्रकारची फुले कोरण्यात आली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in