नव्या-जुन्यांसह नाराजांचा मेळ

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर : ३९ जणांचा समावेश
नव्या-जुन्यांसह नाराजांचा मेळ

नवी दिल्ली : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नव्या-जुन्यांसह नाराजांचा मेळ घालत नवी कार्यकारिणी (काँग्रेस वर्किंग कमिटी) तयार केली आहे. ३९ जणांच्या या नव्या टीममध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मनमोहन सिंह, मल्लिकार्जुन खर्गे या अनुभवी नेत्यांसह १५ नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये काँग्रेसवर नाराज असलेले सचिन पायलट, आनंद शर्मा आणि शशी थरूर यांच्यासह जी-२३ च्या अनेक नेत्यांनाही स्थान देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मुकुल वासनिक, चंद्रकांत हांडोरे, माणिकराव ठाकरे यांच्यासह रजनीताई पाटील, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर यांसारख्या महिला नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. प्रमुख ३९ जणांसह ३२ स्थायी निमंत्रित, ९ विशेष निमंत्रित, युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस आणि सेवादल अध्यक्षांनाही या कमिटीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

काँग्रेस कार्यकारिणीची अनेक दिवसांपासून निवड रखडलेली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर केली. यावर्षी होणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीच्या निवडीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. कारण काँग्रेसमधील अनेक मोठे निर्णय या समितीकडून घेतले जातात. नव्या समितीत सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी या तिघांचाही समावेश आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे काँग्रेसमधील नाराज जी-२३ गटातील शशी थरूर यांनाही काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये स्थान‌ देण्यात आले आहे. काँग्रेस नेते ए. के. अँटोनी यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. तरीही अँटोनी यांना काँग्रेस वर्किंग कमिटीवर कायम ठेवलं आहे. याशिवाय अनुभवी दिग्विजय सिंह, अधीर रंजन चौधरी, अंबिका सोनी, मीरा कुमार, चरणजीत सिंह चन्नी यांचाही नव्या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

१५ नवे चेहरे

काँग्रेसने रविवारी ३९ जणांची नवी कार्यकारिणी जाहीर केली. यात तब्बल १५ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये राजस्थानमधील नाराज सचिन पायलट, पंजाबमधील हिंदुत्ववादी चेहरा आणि माजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी, शशी थरूर, काँग्रेसमध्ये अलीकडेच प्रवेश केलेला तरुण चेहरा कन्हैया कुमार, कर्नाटकातील राज्यसभा खासदार नासीर हुसेन, आपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अलका लांबा, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख पवन खेरा, काँग्रेसचा उत्तराखंडमधील ब्राह्मण चेहरा गणेश गोडीयाल, केरळमधील खासदार कोडीकुन्निल सुरेश, काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनाटे, महाराष्ट्रातील माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आमदार प्रणिती शिंदे, मोदी सरकारवर अविश्वास ठराव मांडताना प्रभावी भाषणाने लक्ष वेधणारे काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई, मध्य प्रदेशचे माजी मंत्री कमलेश्वर पटेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in