मंकीपॉक्सचा राजधानी दिल्लीत आढळला नवा रुग्ण ; देशात एकूण रुग्णसंख्या चार

पश्चिम दिल्लीत राहणाऱ्या ३१ वर्षीय तरुणाला दोन दिवसांपूर्वी लोकनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते
मंकीपॉक्सचा राजधानी दिल्लीत आढळला नवा रुग्ण ; देशात एकूण रुग्णसंख्या चार

साऱ्या जगाची चिंता वाढवणाऱ्या मंकीपॉक्सने देशाच्या राजधानीत प्रवेश केला आहे. केरळनंतर दिल्लीत मंकीपॉक्सचा नवा रुग्ण आढळून आला आहे. दिल्लीत एका ३१ वर्षीय तरुणामध्ये मंकीपॉक्सचा विषाणू आढळून आला आहे. या रुग्णाचा कोणताही परदेश प्रवासाचा इतिहास नाही, त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात आता मंकीपॉक्सचे एकूण रुग्ण चार झाले आहेत. केरळमध्ये आधीच तीन रुग्ण आढळून आले आहेत.

पश्चिम दिल्लीत राहणाऱ्या ३१ वर्षीय तरुणाला दोन दिवसांपूर्वी लोकनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला दोन आठवड्यांपासून ताप येत होता. शिवाय अंगावर पुरळही उठले होते. त्याची चाचणी केली असता त्याच्या शरीरात मंकीपॉक्सचे विषाणू आढळून आले आहेत. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये आयसोलशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्याला मंकीपॉक्सवरील औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. त्याने कोठेही परदेशी प्रवास केलेला नाही; मात्र आजारी पडण्यापूर्वी हा तरुण हिमाचल प्रदेशमध्ये गेला होता, असे लोकनायक रुग्णालयातर्फे सांगण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘‘घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. प्रसार रोखण्यासाठी आमची सर्वोत्तम टीम काम करत आहे.’’

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in