चेन्नई :ऑस्कर विजेते प्रख्यात संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या चेन्नई येथे रविवारी आयोजित कार्यक्रमात प्रमाणापेक्षा अधिक गर्दी जमल्याने प्रचंड चेंगराचेंगरी झाली. यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला आणि अनेक तिकीटधारक श्रोत्यांना प्रवेश करता न आल्यामुळे परत जावे लागले. याची वाच्यता सोशल मीडियावर झाल्यानंतर ए. आर. रेहमान यांनी दखल घेतली असून रसभंग झालेल्या श्रोत्यांना तिकिटाचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आहे. बहुतांश श्रोत्यांनी आयोजकांनी क्षमतेपेक्षा जास्त तिकीट विक्री करून व्यवस्थापनात गफलत केल्याचा आरोप समाजमाध्यमांवर केला आहे.
ए. आर. रेहमान यांनी श्रोत्यांप्रतिच्या आपल्या भावना एक्सवर पोस्ट करून व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, रविवार, १० सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे व्यवस्थापन नीट झाले नाही. २५ हजारांची क्षमता असताना सुमारे ४० हजार लोक आल्यामुळे सर्व गोंधळ उडाला. चेंगराचेंगरी झाली. त्याचा महिला आणि मुलांना खूप त्रास झाला. तेव्हा श्रोत्यांना पैसे परत केले जातील. ऑस्कर पुरस्कार प्राप्त रेहमान यांनी ‘मरक्कुमा नेंजाम’ म्हणजे ‘हृदय विसरेल का’ या अर्थाच्या नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तांबरम सीटी पोलीस कमिशनर ए. अमलराज यांच्या हद्दीतील इस्ट कोस्ट रोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे येथे वाहतूककोंडी देखील झाली. त्यातच मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा ताफा आल्याने वाहतुकीची अधिकच कोंडी झाली. परिणामी अनेक तिकीटधारक कार्यक्रमास पोहोचूही शकले नाहीत. त्याबाबत रेहमान यांनी माफी मागितली असून तिकिटाची कॉपी संकेतस्थळावर पोस्ट करण्याची विनंती केली आहे.