नवी दिल्ली : मूल न होणाऱ्या अनेक जोडप्यांना दत्तक मूल हे आशेचा किरण असतात. तसेच काही एकल व्यक्तींना विवाहाच्या बंधनात अडकायचे नसते. पण त्यांना आई किंवा वडील बनण्याची इच्छा असते. आतापर्यंत सरकारच्या नियमांच्या आडकाठीमुळे त्यांना मुले दत्तक घेता येत नव्हती. आता देशातील ‘एकल पालकां’ना मुले दत्तक घेता येणार आहेत. केंद्राच्या महिला व बालकल्याण खात्याने याबाबत नवीन नियम जारी केला आहे. त्याचा फायदा लाखो नागरिकांना होणार आहे.
नवीन नियमामुळे अविवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा कायदेशीररीत्या ३५ ते ६० वयोगटातील व्यक्तीही मुले दत्तक घेऊ शकतात. यापूर्वी २०१६ च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, केवळ विवाहित जोडप्यांनाच मुले दत्तक घेण्याची परवानगी होती. तसेच ‘एकल महिला’ मुलगा किंवा मुलीला दत्तक घेऊ शकत होते, तर पुरुष केवळ मुलालाच दत्तक घेऊ शकत होते.
सरकारच्या नवीन नियमानुसार, विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा कायदेशीररीत्या वेगळे राहणाऱ्यांना मूल दत्तक घेण्यास परवानगी मिळाली आहे. कोणत्याही विवाहित जोडप्यांना मूल दत्तक घ्यायचे असल्यास नवीन नियमानुसार, त्यांना किमान दोन वर्षे स्थिर वैवाहिक जीवन जगावे लागणार आहे. यापूर्वी याबाबत कोणताही नियम नव्हता. २०१६ च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, २०२१ मध्ये ‘युवा न्याय’ नियमात सुधारणा तसेच २०२२ मध्ये ‘किशोर न्याय मार्गदर्शक’ नियमात सुधारणा केली. हे नवीन नियम व निर्देश जूनमध्ये जारी केले गेले आहेत.
२०१६ च्या नियमानुसार, पती-पत्नीचे वय ३५ वर्षांपेक्षा अधिक असायला हवे. ते ६ ते १२ व १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुले दत्तक घेऊ शकतात. तसेच विवाहित जोडप्याचे संयुक्त वय ७० पेक्षा कमी असावे. तसेच ६ ते १२ वयोगटातील मूल दत्तक घेण्यापूर्वी ‘एकल पालका’चे वय ५५ वर्षांपर्यंत असावे, तर १२ ते १८ वयोगटातील मुलगा दत्तक घेण्यापूर्वी ‘एकल पालका’चे वय ६० वर्षे असावे, असे नमूद करण्यात आले आहे.
‘केअरिंग्ज’च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज
‘चाईल्ड ॲॅडॉप्शन इन्फॉर्मेशन ॲँड गायडन्स सिस्टीम’च्या (केअरिंग्ज) माध्यमातून ‘एकल पालक’ ऑनलाईन नोंदणी करू शकतात. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मार्च २०२४ पर्यंत गोवा, हरयाणा आणि लक्षद्वीप वगळता राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १,६५३ दत्तक मुलांचे पालनपोषण सुरू होते.