ऑगस्ट महिन्यात भारताच्या निर्यातीत किरकोळ वाढ झाली आहे. या महिन्यात निर्यात १.६२ टक्के वाढून ३३.९२ अब्ज डॉलर्स झाली आहे. या कालावधीत, देशाची व्यापार तूट दुपटीने वाढून २७.९८ अब्ज डॉलर्स झाली आहे.
ऑगस्ट २०२१ मध्ये व्यापार तूट ११.७१ अब्ज डॉलर्स होती. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत याची पुष्टी झाली आहे. भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी (१४ सप्टेंबर) यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली.
एप्रिल ते ऑगस्टदरम्यान व्यापार तूट १२४ अब्ज डॉलर्स
या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये देशाची आयात ३७.२८ टक्क्यांनी वाढून ६१.९ अब्ज डॉलर्स झाली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२२-२३च्या एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यांत देशाच्या निर्यातीत १७.६८ टक्के वाढ नोंदवली गेली आणि ती १९३.५१ अब्ज डॉलरवर पोहोचली. त्याच वेळी, या पाच महिन्यांत आयात ४५.७४ टक्क्यांनी वाढून ३१८ अब्ज डॉलर्स झाली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल-ऑगस्ट दरम्यान व्यापार तूट १२४.५२ अब्ज डॉलर्स इतकी वाढली आहे, जी मागील आर्थिक वर्षातील समान कालावधीत ५३.७८ अब्ज डॉलर्स होती.