निर्दयीपणे आठवेळा ट्रॅक्टर अंगावर चढवला रस्त्याच्या वादावरुन राजस्थानात तरुणाची निर्घृण हत्या

दोन्ही गटांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून २२ जणांवर बंदी घालण्यात आली
निर्दयीपणे आठवेळा ट्रॅक्टर अंगावर चढवला रस्त्याच्या वादावरुन राजस्थानात तरुणाची निर्घृण हत्या

बयाणा (राजस्थान) : राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील बयाना गावात रस्त्याच्या किरकोळ वादातून एका तरुणाची निर्दयीपणे तब्बल ८ वेळा ट्रॅक्टरचे चाक चढवून निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपीने ट्रॅक्टर मागे-पुढे करुन मेल्याची खात्री होर्इपर्यंत ट्रॅक्टरचे चाक तरुणाच्या अंगावर घातले. या घटनेनंतर गावात कमालीचा तणाव पसरला आहे.

पोलीस ठाण्याचे एसएचओ जयप्रकाश परमार यांच्या माहितीनुसार, बयाना गावातील बहादूर गुर्जर आणि अतारसिंग गुर्जर या दोन गटामध्ये रस्त्याच्या संदर्भात बराच काळ वाद सुरू आहे. या वादावरून बुधवारी सकाळी आठच्या सुमारास दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाठ्या-काठ्या आणि दगडफेक केली. हाणामारीत दोन्ही बाजूच्या महिलांचाही सहभाग होता. राडा सुरू असताना ३५ वर्षीय निरपत गुर्जर जमिनीवर पडला. तेव्हा एका तरुणाने निरपतवर ट्रॅक्टर चालवला. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर देखील आरोपी ट्रॅक्टर चालकाने न थांबता जमिनीवर पडलेल्या निरपतवर ट्रॅक्टरचे चाक ८ वेळा चालवले. जखमी निरपतचा जागीच मृत्यू झाला.

हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बयाना सीएचसी येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मारामारीदरम्यान गोळीबाराचा आवाजही ऐकू आला. आरोपी ट्रॅक्टर चालकाची ओळख पटवली जात आहे. मृत निरपत सिंगचे वडील अतार सिंग आणि इतरांनाही या मारामारीत दुखापत झाली.

या वादानंतर २२ जणांवर बंदी

एएसपी ओमप्रकाश यांच्या माहितीनुसार, घटनेनंतर बयानाचे एसएचओ आणि सीओ घटनास्थळी पोहोचले होते. पाच दिवसांपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला होता. दोन्ही गटांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून २२ जणांवर बंदी घालण्यात आली. ट्रॅक्टर चालकाची ओळख पटवून लवकरच त्याला पकडण्यात येईल. दोन्ही गटांच्या या हाणामारीत दोन मुलांसह एकूण ११ जण जखमी झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in