देशात ६ कोटी मृतांचे आधार कार्ड सक्रिय; ‘यूआयडीएआय’ सुरू करणार सर्वेक्षण

देशातील प्रत्येक नागरिकाला आधार क्रमांक देऊन १५ वर्षे झाली आहेत. या काळात १.४२ कोटींहून अधिक आधार कार्ड जारी करण्यात आले होते. परंतु याकाळात ८ कोटींहून अधिक आधार कार्डधारकांचा मृत्यू होऊनही, केवळ १.८३ कोटी कार्ड निष्क्रिय करण्यात आले आहेत.
देशात ६ कोटी मृतांचे आधार कार्ड सक्रिय; ‘यूआयडीएआय’ सुरू करणार सर्वेक्षण
Published on

नवी दिल्ली : देशातील प्रत्येक नागरिकाला आधार क्रमांक देऊन १५ वर्षे झाली आहेत. या काळात १.४२ कोटींहून अधिक आधार कार्ड जारी करण्यात आले होते. परंतु याकाळात ८ कोटींहून अधिक आधार कार्डधारकांचा मृत्यू होऊनही, केवळ १.८३ कोटी कार्ड निष्क्रिय करण्यात आले आहेत. सुमारे ६ कोटी मृतांचे आधार क्रमांक अजूनही सक्रिय आहेत. यामुळे बँक फसवणूक, बनावट खाती आणि सरकारी योजनांच्या लाभांचा गैरवापर होण्याचा धोका वाढला आहे.

यामुळे ‘यूआयडीएआय’ याबाबत सर्वेक्षण सुरू करणार आहे. ‘युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया’चे (यूआयडीएआय) सीईओ भुवनेश कुमार यांच्या मते, यूआयडीएआयला आतापर्यंत ‘रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया’कडून (आरजीआय) १५.५ दशलक्ष मृत व्यक्तींचा डेटा मिळाला आहे. नोव्हेंबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ दरम्यान या यादीत अतिरिक्त ३.८ दशलक्ष व्यक्तींची भर पडली. यापैकी १.१७ कोटी लोकांची ओळख पटली आहे आणि त्यांचे आधार कार्ड निष्क्रिय करण्यात आले आहेत. डिसेंबरपर्यंत २० दशलक्ष कार्ड निष्क्रिय होतील, असा प्राधिकरणाचा अंदाज आहे.

पश्चिम बंगालमध्ये ३४ लाख आधारकार्डधारक ‘मृत’

पश्चिम बंगालमध्ये तब्बल ३४ लाख आधार कार्डधारक ‘मृत’ असल्याचे ‘यूआयडीएआय’ने निवडणूक आयोगाला कळवले आहे. ही माहिती आधार योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीवर आधारित आहे. प्राधिकरण आणि पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बुधवारी एकत्रित बैठक घेतली. यावेळी प्राधिकरणाने सांगितले की, सुमारे १३ लाख नागरिक असे होते, ज्यांच्याकडे कधीच आधार कार्ड नव्हते, पण त्यांच्या मृत्यूची नोंद आता झाली आहे. ही बैठक सध्या राज्यात सुरू असलेल्या ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (एसआयआर) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर झाली. या मोहिमेअंतर्गत मतदार याद्यांचे पुनरावलोकन आणि दुरुस्ती केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in