'इंडिया'ला अजून एक धक्का; आपची पंजाबमध्ये स्वबळाची घोषणा

'बंगालमध्ये आम्ही एकटेच लढणार, असे मी नेहमी सांगत आलीये. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू', असे म्हणत ममता बॅनर्जी यांनीही स्वबळाचा नारा दिला आहे.
'इंडिया'ला अजून एक धक्का; आपची पंजाबमध्ये स्वबळाची घोषणा

राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांची मोट बांधून निर्माण झालेल्या 'इंडिया' आघाडीला धक्क्यांमागून धक्के मिळत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात आगामी लोकसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर आम आदमी पक्षानेही आपली वेगळी वाट निवडली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आप लोकसभेच्या 13 जागा लढवणार असून त्या जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.

आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपाबाबत चर्चा सुरु होती. आता मान यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ही चर्चा थांबली आहे. हा इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष कोणतीही आघाडी करणार नाही, असे मान यांनी म्हटले आहे. पंजाबमध्ये आमचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही. राज्यामध्ये असलेल्या 13 लोकसभेच्या जागांसाठी पक्षाने 40 उमेदवार निवडले असून उमेदवारांचे सर्वेक्षण सुरु आहे, असेही मान म्हणाले. तर, दिल्लीमध्ये असलेल्या लोकसभेच्या सात जागांसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे. दोन्ही पक्षांमध्ये त्याबाबत चर्चा सुरु आहे.

ममता बॅनर्जींचा 'एकला चलो रे'चा नारा-

'बंगालमध्ये आम्ही एकटेच लढणार, असे मी नेहमी सांगत आलीये. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू', असे म्हणत ममता बॅनर्जी यांनीही स्वबळाचा नारा दिला आहे.

दरम्यान, आधी तृणमूल काँग्रेस आणि आता आम आदमी पार्टीने अनुक्रमे पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये स्वबळाचा नारा दिल्याने इंडिया आघाडीचे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in