दिल्लीचे मंत्री कैलाश गेहलोत यांचा राजीनामा ‘आप’ला जोरदार झटका

आम आदमी पार्टीने (आप) दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही, पक्ष आता सामान्य जनतेचा राहिलेला नाही, असे आरोप करीत दिल्लीचे परिवहनमंत्री कैलाश गेहलोत यांनी रविवारी मंत्रिपदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
 कैलाश गेहलोत
कैलाश गेहलोत
Published on

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने (आप) दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही, पक्ष आता सामान्य जनतेचा राहिलेला नाही, असे आरोप करीत दिल्लीचे परिवहनमंत्री कैलाश गेहलोत यांनी रविवारी मंत्रिपदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

महाराष्ट्र आणि झारखंडपाठोपाठ काही महिन्यातच दिल्ली विधानसभेची निवडणूकही होणार असतानाच गेहलोत यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला चांगलाच हादरा बसला आहे. आपचे समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे गेहलोत यांनी राजीनामा पाठविला आहे.

शीशमहालसारखे अनेक लाजिरवाणे आणि अजब असे वाद पक्षाशी जोडले गेले आहेत. या वादामुळे पक्षातील सर्व सदस्य संशयाच्या भोवऱ्यात अडकले असून आपण अजूनही ‘आम आदमी’ आहोत, असा विश्वास वाटत नाही. दिल्ली सरकार आपला जास्तीत जास्त वेळ केंद्र सरकारशी झगडण्यात वाया घालवत आहे, हे तर आता स्पष्ट झाले आहे. यामुळे दिल्लीची प्रगती होणार नाही. त्यामुळेच पक्षापासून वेगळे होण्याशिवाय आता माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही. यासाठीच मी पक्षाचा राजीनामा देत आहे, असे गेहलोत यांनी राजीनाम्यामध्ये म्हटले आहे.

कैलाश गेहलोत यांच्याकडे परिवहन खात्यासह प्रशासकीय सुधारणा, माहिती तंत्रज्ञान, महिला आणि बाल विकास अशा खात्यांची जबाबदारी होती. त्यांनी या सर्व खात्यांचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्ष आणि दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळातील कैलाश गेहलोत हे प्रमुख नेते होते. पक्षाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत, यामुळे ते अस्वस्थ असल्याचे बोलले जाते.

logo
marathi.freepressjournal.in