नवी दिल्ली : दिल्ली व पंजाबमध्ये सत्ताधारी असणाऱ्या आम आदमी पार्टीने दिल्लीतील प्रदूषणाला हरयाणा सरकार प्रमुख जबाबदार असल्याचा दावा केला आहे. प्रदूषणाच्या या सर्वकालीन समस्येबद्दल राजकीय आखाडा होऊ देऊ नका, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही दुसऱ्याच दिवशी ‘आप’ने ही टीका केली आहे. तर या पार्श्वभूमीवर आता माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी दिल्लीतील वायू प्रदूषणाबद्दल राजकारण न करता सर्वसंमत पद्धतीने तोडगा काढावा, असे आवाहन केले आहे.
दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असताना, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांना पिकांचे अवशेष जाळणे ताबडतोब थांबवण्याचे निर्देश दिले होते. ‘आप’ने केलेल्या या आरोपांबद्दल भाजप वा हरयाणा सरकारने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मंगळवारी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी वायू प्रदूषणाला सीमेची बंधने नसतात, असे सांगत त्यांच्या राज्यातील व दिल्लीतील लोक पंजाबमधील कोपणी झालेल्या पिकांचा पालापाचोळा जाळण्याच्या अनेक घटनांमुळे त्रस्त असल्याचे विधान केले होते. मात्र, या प्रश्नी राजकारण होता कामा नये, ही सर्वांची सामूहीक जबाबदारी आहे व पर्यावरण चांगले ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे म्हटले होते.
'आप'चे आमदार दुर्गेश पाठक यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री निवडणूक प्रचारात मग्न असल्याची टीका केली होती. हरयाणात कैथल येथे अधिक प्रदूषण असूनही त्याबद्दल कोणी बलत नस्लयाचे त्यांनी सांगितले होती. या सर्व प्रकारामध्ये आता माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि शेजारचची राज्ये यांनी शहरातील ही प्रदूषणाची समस्या निवारण्यासाठी एकत्रितपणे उपाययोजना शोधण्यासाठी यावे, या प्रश्नामध्ये राजकारण करू नये आणि त्वरेने या गंभीर समस्येवर लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे. दिल्लीतील प्रदूषणासंबंधात दिल्ली सरकार व केंद्र सरकार यांची जबाबदारी आहे. शेजारच्या राज्यांनीही एकत्र येऊन कालनियंत्रित कार्यक्रम आखून या समस्येवर उपाय करावेत, असे त्यांनी सांगितले.