पंजाबमध्ये ‘आप’ला हादरा; एकमेव खासदार रिंकू यांचा भाजपमध्ये प्रवेश

गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या जालंधर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत, रिंकू यांनी काँग्रेसच्या करमजीत कौर यांचा ५८६९१ मतांनी पराभव केला. १९९९ नंतर प्रथमच या मोठ्या जुन्या पक्षाला या जागेवर पराभवाचा सामना करावा लागला.
पंजाबमध्ये ‘आप’ला हादरा; एकमेव खासदार रिंकू यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाला (आप) मोठा राजकीय धक्का बसला आहे. आपचे लोकसभेतील एकमेव खासदार सुशील कुमार रिंकू यांनी बुधवारी येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या जालंधर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत, रिंकू यांनी काँग्रेसच्या करमजीत कौर यांचा ५८६९१ मतांनी पराभव केला. १९९९ नंतर प्रथमच या मोठ्या जुन्या पक्षाला या जागेवर पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या माजी नेत्या रिंकू यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि पंजाब भाजपचे प्रमुख सुनील जाखड यांच्या उपस्थितीत पक्षाच्या मुख्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला.

रिंकू यांनी २७ एप्रिल २०२३ रोजी काँग्रेसमधून आपमध्ये प्रवेश केला होता आणि एका दिवसानंतर त्यांना जालंधर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. त्यांच्या विजयामुळे आप पंजाबचा लोकसभेत पुन्हा प्रवेश झाला. जालंधरची ही जागा एक राखीव मतदारसंघ आहे जो राज्याच्या दलितबहुल दोआबा प्रदेशात येतो. रिंकू यांना दलित समाजात चांगला पाठिंबा आहे. हा समाजाच्या मतदारांची टक्केवारी पाहाता ती येथे ४२ टक्के आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी रिंकूसोबत एक गुप्त बैठकही घेतली होती.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत, काँग्रेसने जालंधर लोकसभा जागेवर नऊ पैकी पाच जागांवर विजय मिळवला होता, तर आपने उर्वरित जागा जिंकल्या होत्या. पंजाबमधील लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे.

रिंकू यांच्यासोबत आमदार शीतल अंगुरलही भाजपवासी

आपच्या आमदार शीतल अंगरुल यांनी आपण आपच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून बाहेर पडलो असून आपचा राजीनामा दिला आहे, असे स्पष्ट केले आहे. अंगरुल यांनी २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले सुशील कुमार रिंकू यांचा पराभल केला होता. तर रिंकू यांनी गतवर्षी आपमध्ये काँग्रेसमधून प्रवेश केला व जालंधरमधून ते खासदार झाले होते.

जालंधरच्या विकासासाठी....

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रिंकू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी हा निर्णय जालंधरच्या विकासासाठी घेतला आहे. आम्ही जालंधरला पुढे नेऊ. केंद्र सरकारचे सर्व प्रकल्प जालंधरमध्ये आणू.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in