नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा स्वीय सचिव विभवकुमारने आपल्याला बेदम मारहाण केल्याची तक्रार आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी शुक्रवारी नोंदविली. विभवकुमारने सात-आठ वेळा श्रीमुखात भडकावली. इतकेच नव्हे, तर ठोसेही लगावले. मदतीची याचना करीत होतो तरीही तो थांबला नाही. त्याने छाती, पोटावर आणि कमरेखालील भागावर लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरूच ठेवली, असे मालीवाल यांनी नोंदविलेल्या 'एफआयआर'मध्ये म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्वाती मालीवाल शुक्रवारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाल्या आणि त्यांनी आपला जबाब नोंदविला. केजरीवाल यांच्या निवासस्थानी सोमवारी आपल्याला मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी एफआयआर नोंदविला आणि त्यामध्ये विभवकुमार याचे आरोपी म्हणून नाव नोंदविण्यात आले आहे. आपण वेदनेने विव्हळत होतो. मदतीची याचना करीत होतो, मात्र तरीही न थांबता तो आपल्याला मारहाण करीतच राहिला. पूर्ण ताकदीनिशी तो आपल्याला मारहाण करीत होता, असे मालीवाल यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.
केजरीवाल यांनी माफी मागावी - सीतारामन
आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मौन पाळले आहे. इतकेच नव्हे, तर हल्ला करणारा आरोपी विभवकुमार याच्यासमवेत केजरीवाल निर्लज्जपणे सगळीकडे फिरत आहेत, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी केजरीवाल यांच्यावर केली. आपचे निमंत्रक केजरीवाल यांनी या प्रश्नावरील आपले मौन सोडावे आणि माफी मागावी, अशी मागणी सीतारामन यांनी एका पत्रकार परिषदेत केली. आपच्या अनेक नेत्यांवर महिलांवर हल्ला केल्याचे आरोप आहेत, आप हा महिलाविरोधी पक्ष आहे, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.
'एनसीडब्ल्यू'समोर विभवकुमार गैरहजर
मालीवाल यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी केजरीवाल यांचा स्वीय सचिव विभवकुमारला राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) चौकशीसाठी हजर राहण्याबाबतचे समन्स बजावले होते. मात्र, तो आयोगासमोर हजर राहिला नाही. आयोगाचे पथक गुरुवारी विभवकुमार याच्या घरी समन्स बजावण्यासाठी गेले होते, मात्र त्यावेळी तो घरात नव्हता. विभवकुमार याच्या पत्नीने समन्स स्वीकारण्यास नकार दिला, असे 'एनसीडब्ल्यू'च्या प्रमुख रेखा शर्मा यांनी सांगितले. शुक्रवारीही एनसीडब्ल्यूचे पथक पोलिसांना घेऊन त्याच्या घरी गेले होते, विभवकुमार उद्या हजर झाला नाही तर आपण स्वत: त्याच्या घरी जाणार असल्याचे शर्मा म्हणाल्या.
हे तर भाजपचेच कारस्थान - आतिशी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्वीय सचिवाने आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर शाब्दिक अथवा शारीरिक हल्ला केल्याच्या आरोपांचा आपच्या नेत्या आतिशी यांनी शुक्रवारी स्पष्ट इन्कार केला आणि यामागे भाजप व मालीवाल यांची हातमिळवणी असल्याचा आरोप केला. जेव्हा केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे, तेव्हापासून भाजप धास्तावला आहे. त्यामधूनच भाजपने हे कारस्थान रचले असून मालीवाल यांना केजरीवाल यांच्या निवासस्थानी पाठविण्यात आले, असा आरोप आतिशी यांनी केला आहे. मालीवाल भेटीची वेळ न घेताच केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचल्या, केजरीवाल यांच्यावर आरोप करण्याचा त्यांचा हेतू होता, असेही आतिशी म्हणाल्या.
दिल्ली पोलीस, न्यायवैद्यक पथक केजरीवालांच्या निवासस्थानी
आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांचे पथक न्यायवैद्यक तज्ज्ञांसह शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. हे पथक केजरीवाल यांच्या निवासस्थानामधून सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे गोळा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
'पॉलिटिकल हिटमॅन'चा स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न सुरू
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानामधील सीसीटीव्ही फुटेज ऑनलाईन व्हायरल झाल्यानंतर 'पॉलिटिकल हिटमॅन'ने स्वत:चा बचाव करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असे स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मालीवाल सुरक्षा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत असल्याचा ५२ सेकंदांचा हा व्हिडीओ आहे. नेहमाप्रमाणेच विभवकुमार याने स्वत:चा बचाव करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असे मालीवाल यांनी 'एक्स'वर म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि खोलीतील सीसीटीव्ही फुटेज यांची तपासणी झाल्यानंतर सत्य उजेडात येईल, असेही त्या म्हणाल्या.