अब की बार, ४०० पार! मोदींचा संसदेत बार

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ४०० जागांचा टप्पा पार करेल
अब की बार, ४०० पार! मोदींचा संसदेत बार

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ४०० जागांचा टप्पा पार करेल. त्यात किमान ३७० जागांचा वाटा भाजपचा असेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत व्यक्त केला. अब की बार ४०० पार, असा नाराही त्यांनी दिला. संसदेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनादरम्यान सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या ठरावानिमित्त मोदी बोलत होते. त्यावेळी त्यांनी देशात तिसऱ्या वेळी भाजपचे सरकार येण्याचा दिवस दूर नाही, अशी ग्वाही दिली. तसेच नर्मविनोदाचा आधार घेत काँग्रेसवर खरपूस टीकाही केली.

मला देशातील नागरिकांचा कल जाणवत आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत मतदार भाजपला किमान ३७० जागांवर विजयी करतील, तर भाजपप्रणीत एनडीएला ४०० पेक्षा अधिक जागा मिळतील. आमच्या तिसऱ्या शासनकाळात मोठमोठे निर्णय घेतले गेलेले दिसतील. त्याने पुढील एक हजार वर्षांतील बलशाली भारताचा पाया घातला जाईल. देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला असेल. आमच्या सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामाच्या अनुभवावरून आणि देश सध्या वेगाने करत असलेल्या प्रगतीवरून मी ठामपणे सांगू शकतो की, भाजपच्या तिसऱ्या शासनकाळात भारत जगातील तिसरी आर्थिक शक्ती बनला असेल. ही मोदींची गॅरंटी आहे, असे मोदी यांनी भाषणात सांगितले.

आज आपली महिला शक्ती ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी ताकद देत आहे, असे मोदी म्हणाले. आज १० कोटी भगिनी महिला बचत गटांशी निगडित आहेत. आजमितीला देशात सुमारे १ कोटी लखपती दीदी तयार झाल्या आहेत. ३ कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. २०१४ च्या दहा वर्षांपूर्वी पायाभूत सुविधांचे बजेट फक्त १२ लाख कोटी रुपये होते. गेल्या १० वर्षांत पायाभूत सुविधांवर ४४ लाख कोटी रुपयांच्या वर पोहचले आहे. यामुळे देशात किती नोकऱ्या निर्माण झाल्या असतील याची तुम्ही कल्पना करू शकता, असे ते म्हणाले.

मोदी म्हणाले की, देशाला खरेतर चांगल्या आणि सशक्त विरोधी पक्षाची गरज आहे. पण त्याकामी काँग्रेस अपयशी ठरला आहे. त्यांनी देशाची लूट केली आहे. पण आमचा पक्ष देश लुटणाऱ्यांना क्षमा करणार नाही. देशवासीयांचे जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. पण ते करू शकत नसाल तर माझ्या दिशेने विटा फेका. मी त्यांचा वापर विकसित भारताची बांधणी करण्यासाठी करेन.

नेहरूंच्या मते भारतवासी आळशी आणि अल्पमती!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या आजच्या अवस्थेला तो पक्षच जबाबदार आहे. एकच उत्पादन सारखे सारखे बाजारात आणल्यामुळे त्यांचे दुकान बंद होण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचे शासन म्हणजे महागाई हे समीकरणच बनले आहे. त्यांच्या शासनकाळात दोन गाणी गाजली होती - महंगाई मार गयी आणि महंगाई डायन खाये जात है. जवाहरलाल नेहरू यांना वाटत होते की, भारतवासी आळशी आणि अल्पमती आहेत. त्यांच कन्या इंदिराजीही तशाच होत्या. नेहरूंनी केलेल्या चुकांची मोठी किंमत जम्मू-काश्मीरमधील जनता भोगत आहे, असे मोदी म्हणाले.

तिसऱ्या टर्ममध्ये १००० वर्षांचा पाया!

पंतप्रधान मोदी यांनी आगामी तिसऱ्या कार्यकाळाबद्दल बोलताना सांगितले की, आमची तिसरी टर्म पुढील १००० वर्षांसाठी मजबूत पाया घालण्याचे काम करेल. मला आपल्या देशातील १४० कोटी जनतेच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे ते पाहता मी विश्वासाने सांगू शकतो की आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल, असेही मोदी म्हणाले.

ईडीकडून १ लाख कोटींची मालमत्ता जप्त

नरेंद्र मोदी म्हणाले की, कॉँग्रेस प्रणीत यूपीएच्या कार्यकाळात तपास यंत्रणांचा वापर केवळ राजकीय हेतूंसाठी करण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात ईडीने केवळ ५००० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. आम्ही पीएमएलए अंतर्गत पूर्वीपेक्षा दुप्पट प्रकरणे नोंदवली. आमच्या कार्यकाळात ईडीने एक लाख कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. लुटलेले पैसे परत करावे लागतील, असे स्पष्ट करत ते म्हणाले की, आता गरीबांना लुटणे मध्यस्थांना कठीण झाले आहे. डीबीटी, जन धन खाते, आधार, मोबाईल... आम्ही त्याची ताकद ओळखली आहे. आम्ही थेट लोकांच्या खात्यात ३० लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली आहे.

राहुल गांधींना टोमणा

तुमच्यापैकी अनेकांनी निवडणूक लढवण्याची हिंमत गमावल्याचे मी ऐकले आहे. मागच्या वेळीही अनेकांनी त्यांच्या जागा बदलल्या आणि यावेळीही ते त्यांच्या जागा बदलण्याचा विचार करत आहेत. मी ऐकले आहे की, त्यांना राज्यसभेवर जायचे आहे. त्यामुळे परिस्थितीचे आकलन करून ते स्वत:चा मार्ग शोधत आहेत. आजकाल तुम्ही जे कष्ट घेत आहात त्यावर ईश्वररूपी जनताजनार्दन तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल, असा माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही ज्या उंचीवर आहात त्याहूनही मोठ्या उंचीवर तुम्ही पोहोचाल आणि पुढच्या निवडणुकीनंतर तुम्ही प्रेक्षक गॅलेरीत दिसाल, असे राहुल गांधी यांचे नाव न घेता मोदींनी टोमणा मारला.

logo
marathi.freepressjournal.in