गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या आमदार पुत्राला दोन वर्षांची शिक्षा

उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मुलगा आमदार अब्बास अन्सारी याला प्रक्षोभक वक्तव्याच्या प्रकरणात न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे अन्सारीची आमदारकी धोक्यात आली आहे. याचबरोबर तीन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या आमदार पुत्राला दोन वर्षांची शिक्षा
Published on

मऊ : उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मुलगा आमदार अब्बास अन्सारी याला प्रक्षोभक वक्तव्याच्या प्रकरणात न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे अन्सारीची आमदारकी धोक्यात आली आहे. याचबरोबर तीन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

मऊ जिल्ह्यातील एमपी-एमएलए न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारी के. पी. सिंह यांनी ही शिक्षा सुनावली. २०२२ च्या उत्तर प्रदेशातील मऊ विधानसभा निवडणुकीदरम्यान हा प्रकार घडला होता. अब्बासने अधिकाऱ्यांशी हिशेब चुकता करण्याची आणि त्यांना धडा शिकवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याच प्रकरणात सहआरोपी मन्सूर अन्सारी याला सहा महिने तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अब्बास हा सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचा आमदार आहे. मऊच्या एमपी-एमएलए कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. मऊ कोतवालीचे तत्कालीन उपनिरीक्षक गंगाराम बिंद यांनी एफआयआर दाखल केला होता.

विधानसभा निवडणुकीदरम्यान द्वेषपूर्ण भाषण आणि निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी शनिवारी हा निर्णय देण्यात आला. या प्रकरणातील पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, सीजेएम डॉ. के. पी. सिंह यांनी निर्णयासाठी ३१ मे ही तारीख निश्चित केली होती.

logo
marathi.freepressjournal.in