

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीच्या कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क येथे आयोजित केलेल्या ‘लहरा दो तिरंगा’ या रॅलीसाठी निघालेल्या सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके आणि नेहा बोरा यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १५० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
दीपके हे दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) प्रवक्त्याच्या घरी थांबले होते. ते घरातून बाहेर पडताच पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले. तर ‘आयसा’ अध्यक्ष नेहा बोरा यांना मंडी हाऊस येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. गेल्या सहा दिवसांत दीपके यांना पोलिसांनी दुसऱ्यांदा ताब्यात घेतले आहे. यापूर्वी १० ऑक्टोबरला दीपके यांना जंतर-मंतर येथे आंदोलनाला जाण्यापूर्वी विमानातूनच ताब्यात घेतले होते. दुसऱ्या दिवशी त्यांची सुटका करण्यात आली.
आंदोलनासाठी जाण्यापूर्वीच घेतले ताब्यात
स्थानबद्ध होण्यापूर्वी दीपके यांनी व्हिडीओत सांगितले की, ‘दिल्ली पोलिसांचे सात ते आठ जण आले होते. तुम्ही जनतेला भडकवत आहात. तुम्ही तिरंगा फडकण्यासाठी जाऊ शकत नाही. म्हणजे, आता आपल्याच देशात तिरंगा फडकवण्यास विरोध केला जात आहे. सीजेपी नेते अभिजीत दीपके आणि ‘आयसा’ प्रमुख नेहा बोरा यांना शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ताब्यात घेतले. हे दोघेही 'लेहरा दो तिरंगा' आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात होते; दिपके ' कॅनॉट प्लेस'च्या दिशेने, तर बोरा ह्या 'मंडी हाऊस'च्या दिशेने जात होत्या.दीपके यांना त्यांच्या झंडेवाला येथील निवासस्थानावरून, तर बोरा यांना मंडी हाऊस परिसरातून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईदरम्यान तेथील गर्दी, कॅमेरामन आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात काही काळ धक्काबुक्की झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
निवासस्थानी जाऊन दिली नोटीस
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतल्यानंतर दिपके यांना जाफरपूर कलान पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याआधी, शुक्रवारी दिवसा दिल्ली पोलिसांच्या २० हून अधिक जवानांनी झंडेवाला येथील दीपके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना एक नोटीस दिली होती. नागरिकांचे, व्यापाऱ्यांचे, प्रवाशांचे, रुग्णांचे किंवा इतरांचे अधिकार बाधित होतील, अशी कोणतीही कृती न करण्याचे निर्देश या नोटीसद्वारे देण्यात आले होते. शुक्रवारी संध्याकाळी नियोजित असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
कायदा, सुव्यवस्था राखणे हाच उद्देश
दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी संसद मार्ग पोलीस ठाण्यातील ‘डीसीपी नवी दिल्ली’ कार्यालयाला भेट दिली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही दीपके आणि बोरा यांना ताब्यात घेतले आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे. काही आंदोलक कॅनॉट प्लेसवर पोहोचले आहेत, त्यांना लवकरच तिथून हटवले जाईल. आमचा मुख्य उद्देश कायदा व सुव्यवस्था राखणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे हा आहे.’