

नवी दिल्ली : परीक्षांमधील गैरप्रकार आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दिपके येत्या ६ जून रोजी भारतात परतणार आहेत. दिल्लीत एका शांततापूर्ण आंदोलनाद्वारे ते आपल्या मोहिमेची सुरुवात करणार असल्याची माहिती त्यांनी सोमवारी दिली.
इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये दिपके यांनी त्यांचे समर्थक आणि विद्यार्थ्यांना दिल्लीतील या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आता आपल्या सर्वांना एकत्र येण्याची वेळ आली आहे. भारतीय संविधानाच्या मार्गाने जात, शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आपल्याला करायची आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला, तर त्यांना नक्कीच आपले ऐकावे लागेल," असे दिपके व्हिडिओत म्हणाले.
दिपके यांनी समर्थकांना ६ जून रोजी विमानतळावर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ते पुढे म्हणाले, "मी शनिवारी, ६ जून रोजी सकाळी दिल्लीत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया तुम्ही सर्वांनी विमानतळावर माझ्यासोबत सामील व्हा. तेथून आपण एकत्र जंतरमंतर येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी परवानगी मागण्याकरिता पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जाऊ.”