खूप मोठा प्रवास बाकी, लढा संपलेला नाही; अभिजित दीपके यांचा निर्धार

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर ३६ दिवसांचे आंदोलन थांबवण्याची घोषणा 'कॉकरोच जनता पार्टी'ने केली असली, तरी हा लढा संपलेला नसून तो आता देशभर तळागाळात नेण्याचा निर्धार संघटनेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
खूप मोठा प्रवास बाकी, लढा संपलेला नाही; अभिजित दीपके यांचा निर्धार
खूप मोठा प्रवास बाकी, लढा संपलेला नाही; अभिजित दीपके यांचा निर्धारPhoto : X
Published on

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर ३६ दिवसांचे आंदोलन थांबवण्याची घोषणा 'कॉकरोच जनता पार्टी'ने केली असली, तरी हा लढा संपलेला नसून तो आता देशभर तळागाळात नेण्याचा निर्धार संघटनेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. शिक्षण क्षेत्रातील व्यापक सुधारणांसाठी आणि युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवण्याचा संकल्प पार्टीने व्यक्त केला आहे.

आंदोलन मागे घेण्याची घोषणा करताना पार्टीच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, "आंदोलन स्थगित केले म्हणजे लढा संपला असे नाही. कॉकरोच जनता पार्टीला खूप मोठा प्रवास करायचा आहे असे सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी म्हटले आहे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हे आंदोलनाचे अंतिम उद्दिष्ट नव्हते, तर हा दीर्घकालीन परिवर्तनाच्या लढ्याचा प्रारंभ आहे, असे सीजेपीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

संघटना पुढेही युवकांशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठवत राहील आणि शिक्षण तसेच प्रशासनातील सुधारणांसाठी काम करेल, असे सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी पीटीआयला सांगितले.

"देशात ७५० ते ८०० राजकीय पक्ष आहेत, पण युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आम्ही हा लढा तळागाळात नेऊ इच्छितो, जेणेकरून कोणतेही सरकार किंवा कोणताही राजकीय पक्ष सत्तेत असो, त्यांना युवकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काम करावे लागेल. सध्या हाच आमचा अजेंडा आहे," असेही दास म्हणाले.

जंतरमंतर शांत

केंद्र सरकारने आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्याने ३६ दिवसांच्या आंदोलनानंतर ‘जंतर-मंतर’ आता शांत झाले आहे. बहुसंख्य आंदोलक रातोरात घरी परतले असून तंबू गुंडाळण्यात आले आहेत. अभिजित दीपके यांना टायफॉईड झाला असून ते उपचारा घेत आहेत. अनेक दिवसांनंतर आपण शांतपणे झोपलो असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान इथून पालिकेने ६० मेट्रिक टन कचरा साफ करण्यात आला आहे.

भविष्यात राजकारण प्रवेशाचा मार्ग खुला?

संघटनेचे आणखी एक नेते आशुतोष रांका यांनी भविष्यात राजकीय पक्ष म्हणून सीजेपी निवडणूक राजकारणात उतरण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावलेली नाही. "सार्वजनिक जीवन आणि राजकारणातील माझ्या अल्प अनुभवातून मी एकच गोष्ट शिकलो आहे- 'कधीच नाही' असे कधीही म्हणू नका," असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना रांका यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in