‘नीट’ परीक्षा रद्द करा; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

गैरव्यवहारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली यंदाची ‘नीट’ परीक्षा रद्द करावी, अशी मागणी एका याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टात केली आहे.
‘नीट’ परीक्षा रद्द करा; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
स्क्रीनशॉट, एक्स @NCMIndiaa

नवी दिल्ली : गैरव्यवहारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली यंदाची ‘नीट’ परीक्षा रद्द करावी, अशी मागणी एका याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टात केली आहे. या परीक्षेतील गैरप्रकाराची सीबीआय किंवा स्वतंत्र संस्थेमार्फत चौकशी करावी, असे या याचिकेत नमूद केले.

‘नीट’ची परीक्षा दिलेल्या २० विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून सांगितले की, यंदाच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले आहेत. त्यामुळे वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेणे हाच चांगला पर्याय आहे. ‘एनटीए’ने यंदाची परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घ्यावी. ‘नीट’ परीक्षेच्या पावित्र्याला धक्का लागला असून पेपरफुटीचे प्रकारही उघड झाले आहेत. या प्रकरणी अनेकांविरोधात गुन्हे दाखल झाले असून अटकही झाली आहे, असे याचिकादारांचे वकील धीरज सिंह यांनी सांगितले.

यंदाच्या परीक्षेत ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले, तर ६२० ते ७२० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ४०० टक्क्याने वाढ झाली. त्यामुळे या गैरप्रकाराची सीबीआय किंवा स्वतंत्र संस्थेमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. त्यावर न्यायालयाची देखरेख गरजेची आहे. कारण परीक्षेतील गैरप्रकारामुळे अनेक गुणवान विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची भीती आहे. ज्या विद्यार्थ्यांना ६२० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत, त्यांची शैक्षणिक कारकीर्द व न्यायवैज्ञक विश्लेषण करावे, अशी मागणी त्यांनी केली.

भविष्यात ‘नीट’ परीक्षेत गैरव्यवहार होऊ नयेत म्हणून या परीक्षेत पारदर्शकता वाढवावी, असे आदेश ‘एनटीए’ला द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in