जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी कलम ३७० रद्द करण्याचे काम अतिशय महत्त्वाची कामगिरी निभावणारे ठरले असल्याचे सांगत, काश्मीर खोरे हे ठिकाण स्वित्झर्लंडला टक्कर देणारे पर्यटन स्थळ बनवण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील मौलाना आझाद स्टेडियमवर एका समारंभात बोलताना केले.
आम्ही विकसित जम्मू-काश्मीरचे वचन दिले आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की, आम्ही जम्मू आणि काश्मीर अधिक विकसित करू आणि येत्या काही वर्षांत तुमची सर्व स्वप्नं पूर्ण करू. आम्ही काश्मीरमध्ये अशा पायाभूत सुविधा निर्माण करू की लोक स्वित्झर्लंडला जाणे विसरतील, असे त्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरसाठी ३२ हजार कोटी रुपये आणि देशाच्या इतर भागांसाठी साडेतेरा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण केले. त्यानिमित्ताने आयोजित समारंभात ते बोलत होते. जी-२० कार्यक्रमानंतर आखाती देशांतून गुंतवणुकीत वाढ झाल्याचे मोदींनी अधोरेखित केले. गेल्या वर्षी हा प्रदेश, ज्याने त्याच्या निसर्गरम्य सौंदर्याकडे जगाचे लक्ष वेधले.
मोदींनी या प्रदेशासाठी एका नव्या युगाची घोषणा केली आणि जाहीर केले की, जम्मू आणि काश्मीर घराणेशाहीपासून मुक्त होत आहे, त्यांचे सरकार आता थेट जनतेशी संलग्न आहे. आपल्या ३० मिनिटांहून अधिक काळ केलेल्या भाषणादरम्यान, मोदींनी हिंसाचार आणि फुटीरतावादाने ग्रस्त झालेल्या जम्मू-काश्मीरच्या अशांत भूतकाळाची आठवण करून दिली. तसेच संतुलित विकास उपक्रमांचे श्रेय देत, सुसंवादी आणि समृद्ध जम्मू आणि काश्मीरकडे सध्याच्या बदलाची प्रशंसा केली.
आम्ही ते दिवस पाहिले आहेत जेव्हा जम्मू-काश्मीरमधून फक्त निराशाजनक बातम्या येत होत्या. बॉम्ब, बंदुका, अपहरण आणि फुटीरतावाद हे त्याचे दुर्दैव बनले होते. आज आपण संतुलित आणि सर्वांगीण विकासासह नवीन जम्मू-कश्मीर पाहत आहोत, असे मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले. डोगरी भाषेत त्यांनी प्रथम सुरुवात केली. पाऊस असूनही हजारोंच्या संख्येने स्थानिक लोक रॅलीत सहभागी झाले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर मोदींचा जम्मू प्रदेशाचा हा दुसरा दौरा होता. यापूर्वी त्यांनी एप्रिल २०२२ मध्ये सांबा जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित केले होते.