दीड वर्षात सुमारे १० लाख पदांची भरती होणार,मोदींनी दिले निर्देश

दीड वर्षात केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये १० लाख पदांची भरती करण्यात येणार आहे
 दीड वर्षात सुमारे १० लाख पदांची भरती होणार,मोदींनी दिले निर्देश

केंद्र सरकारच्या विविध खात्यातील अनेक पदे गेली काही वर्षे रिक्त आहेत. ही पदे भरण्यात यावी, अशी मागणी कामगार संघटनांकडून नेहमी करण्यात येते. या पार्श्वभूमीवर येत्या दीड वर्षात सुमारे १० लाख पदांची भरती करण्यात यावी, असे निर्देश खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दीड वर्षात केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये १० लाख पदांची भरती करण्यात येणार आहे.

पीएमओ ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांमधील मानव संसाधनांचा आढावा घेतला आहे. यासोबतच येत्या दीड वर्षात मिशन मोडवर काम करून १० लाख लोकांची भरती करावी, असे आदेशही त्यांनी सरकारला दिले आहेत,” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मोदी सरकारचा हा निर्णय रोजगार शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. गेल्या काही दिवसांत पाटणा, अलाहाबाद या शहरांमध्ये तरुणांनी रेल्वे भरतीसाठी निदर्शने केली होती. मोदी सरकारवर हल्लाबोल करत अनेकदा ते रोजगार देऊ शकले नसल्याचा आरोप केला जात आहे. विशेषत: नोटाबंदी, जीएसटी आणि नंतर कोरोना या काळात अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावल्यामुळे खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधी फारशा वाढलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत मोदी सरकारची ही घोषणा सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी दिलासादायक ठरणार आहे. मात्र, या घोषणेला कँग्रेसने विरोध केला आहे. मोदी सरकारने केलेली घोषणा म्हणजे महाजुमलेबाजी असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले हेाते. ते पाळले नाही, असे गांधी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in