"भारत सरकारने काही अकाउंट ब्लॉक करण्याचे आदेश दिले", मस्कच्या X ने तीव्र 'असहमती' दर्शवत केली कारवाई

आम्ही ही खाती आणि पोस्ट फक्त भारतातच ब्लॉक करत आहोत; तथापि, आम्ही या कृतीशी असहमत आहोत
भारत सरकारच्या आदेशाशी सहमत नसल्याचे 'एक्स'ने म्हटले आहे.
भारत सरकारच्या आदेशाशी सहमत नसल्याचे 'एक्स'ने म्हटले आहे. (इलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित खाती आणि पोस्ट ब्लॅाक करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशाशी अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्कच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ने गुरुवारी तीव्र असहमती दर्शवत कारवाई केली. "भारत सरकारने X ला काही खाती आणि पोस्ट्सवर कारवाई करण्यास सांगणारे कार्यकारी आदेश जारी केले आहेत, तसे न केल्यास दंड आणि तुरूंगवासाचीही शक्यता आहे. आदेशांचे पालन करून, आम्ही ही खाती आणि पोस्ट फक्त भारतातच ब्लॉक करत आहोत; तथापि, आम्ही या कृतीशी असहमत आहोत", असे 'एक्स'च्या 'ग्लोबल गन्हर्नमेंट अफेअर्स' टीमने पोस्ट करत सांगितले.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या विनंतीवरून माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने समाजमाध्यम एक्सला शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी सबंधित १७७ खाती तात्पुरती ब्लाॅक करण्याचे आदेश दिले, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे एक्सला विशिष्ट खाती आणि पोस्ट हटविण्याबाबतच्या आदेशावर कारवाई करणे गरजेचे ठरणार आहे. या आदेशाचे पालन करण्यासाठी किमान भारतामध्ये तरी आम्हाला या खात्यांवर आणि पोस्टवर निर्बंध घालावे लागणार आहेत. तथापि या आदेशाशी आम्ही असहमत आहोत, आमचे या खात्यांबाबतचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवावे, असे एक्सने पोस्टमध्ये म्हटले आहे.

...मनमानी निर्णय वाढतील

भारत सरकारच्या अकाउंट ब्लॉक करण्याच्या आदेशाला आव्हान देणारी एक रिट याचिका प्रलंबित आहे. आमच्या धोरणानुसार आम्ही प्रभावित वापरकर्त्यांना त्याबाबती सूचना देखील दिली आहे, असेही एक्सने सांगितले. पुढे, "कायदेशीर निर्बंधांमुळे, आम्ही येथे भारत सरकारचे कार्यकारी आदेश प्रकाशित करू शकत नाही, परंतु पारदर्शकतेसाठी ते सार्वजनिक करणे महत्त्वाचे आहे असे आम्हाला वाटते. सार्वजनिक न केल्यास, जबाबदारी निश्चित होणार नाही आणि मनमानी निर्णय वाढतील," असेही नमूद केले आहे.

पिकांसाठी किमान हमीभाव आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची कायदेशीर हमी द्यावी आदी मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयातील अधिकारी ‘एक्स’च्या निवेदनाचा अभ्यास करत असून लवकरच त्याला उत्तर दिले जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in