मोदी-जिनपिंग भेटीवरून आरोप-प्रत्यारोप

भारताने चीनचा दावा फेटाळत चीननेच यापूर्वी भेटीसाठी विनंती केल्याचे म्हटले आहे
मोदी-जिनपिंग भेटीवरून आरोप-प्रत्यारोप

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्स संघटनेच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी चालता-चालता काही क्षण बोलणी केली. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. या भेटीसाठी भारताने मागणी केली होती, असे चीनने म्हटले आहे. तर भारताने चीनचा दावा फेटाळत चीननेच यापूर्वी भेटीसाठी विनंती केल्याचे म्हटले आहे.

चीनने २०२० साली लडाखमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यापासून दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत. त्यानंतर दोन्ही देशांचे नेते काही आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये एका मंचावर आले. पण त्यांनी थेट समोरासमोर येऊन बोलणे टाळले होते. लडाखमधील चीनच्या घुसखोरीप्रश्नी दोन्ही देशांच्या लष्कराच्या कोअर कमांडर पातळीवरील चर्चेची १९वी फेरी नुकतीच पार पडली. तसेच सप्टेंबरमध्ये नवी दिल्लीत होणाऱ्या जी-२० परिषदेला जिनपिंग उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिक्स बैठकीवेळी मोदी आणि जिनपिंग यांनी काही वेळ चालता-चालता बोलणी केली. त्यात त्यांनी लडाखमधील परिस्थितीवर ओझरती चर्चा केल्याचे वृत्त आहे.

या अल्पशा भेटीवरून आता मोठेपणाचा वाद रंगला आहे. या भेटीसाठी भारतानेच विनंती केल्याचा दावा चीनने केला आहे, तर भारताना तो दावा फेटाळला असून चीनकडून भेटीसाठी आलेली विनंती प्रलंबित होती. त्यामुळे चर्चा झाली, असा खुलासा केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in