पोलिसांकडून विजेचे शॉक, कोऱ्या कागदांवर सह्या; संसद सुरक्षाभंग प्रकरणातील आरोपींची छळाची तक्रार

संसदेची सुरक्षा भेदून सभागृहात धूर सोडल्याप्रकरणी अटक केलेल्या सहापैकी पाच आरोपींनी तपासादरम्यान त्यांचा छळ झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांकडून विजेचे शॉक, कोऱ्या कागदांवर सह्या; संसद सुरक्षाभंग प्रकरणातील आरोपींची छळाची तक्रार

नवी दिल्ली : संसदेची सुरक्षा भेदून सभागृहात धूर सोडल्याप्रकरणी अटक केलेल्या सहापैकी पाच आरोपींनी तपासादरम्यान त्यांचा छळ झाल्याची तक्रार दाखल केली आहे. विरोधी पक्षांशी संबंध असल्याचे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी विजेचे शॉक दिले आणि कोऱ्या कागदपत्रांवर सह्या घेतल्याचा दावा या पाच जणांनी न्यायालयातील सुनावणीत केला आहे.

दोन तरुणांनी १३ डिसेंबर २०२३ रोजी सुरक्षा यंत्रणा भेदून संसदेच्या इमारतीत प्रवेश केला आणि घोषणा देत धूर सोडला. या प्रकरणी त्या दोघांसह त्यांच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली आहे. सागर शर्मा, मनोरंजन डी., अमोल शिंदे, नीलम आझाद, ललित झा आणि महेश कुमावत अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी नीलम आझाद वगळून अन्य पाच आरोपींनी बुधवारी दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात सुनावणीदरम्याम तक्रार नोंदवली की, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तपासणीवेळी त्यांचा छळ केला. देशातील विरोधी पक्षांशी त्यांचा संबंध असल्याचे कबूल करण्यासाठी दबाव आणला. त्यांना विजेचे शॉक देण्यात आले आणि साधारण ७० कोऱ्या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. न्यायालयाने यावर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून उत्तर मागवले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ पेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in