ट्रिलियन डॉलर्सचे ध्येय साध्य करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मुंबईहून रवाना झाले.
ट्रिलियन डॉलर्सचे ध्येय साध्य करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
Published on

प्रतिनिधी/मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे स्वप्न आहे. यासाठी महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे योगदान असणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग आल्यास हे ध्येय पूर्ण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री व्यक्त केला.

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मुंबईहून रवाना झाले. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी एक ट्रिलियन डॉलर्सचे ध्येय साध्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आली पाहिजे, महाराष्ट्राचे ब्रँडिंग झाले पाहिजे, यासाठी दावोस येथे चांगली संधी आहे. आज जगभरातील लोक महाराष्ट्राकडे अपेक्षेने पाहत असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. यावेळी मागील वर्षीपेक्षा जास्त प्रमाणात करार होऊन जास्तीची गुंतवणूक महाराष्ट्रात होईल. यामुळे प्रमुख शहरांसोबतच ग्रामीण भागातही अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. महाराष्ट्रात उत्तम पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि उद्योगांसाठी सवलतीचे धोरण असल्याने दावोस येथील उद्योजक गुंतवणूक करण्यास तसेच उद्योग सुरू करण्यास आग्रही असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम

या सरकारच्या काळात महाराष्ट्र हे परकीय थेट गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आले आहे. गेल्या वर्षी या परिषदेत १ लाख ३७ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी ७६ टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत. आता यापेक्षाही जास्त प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणुकीचे करार केले जातील, असे शिंदे यांनी सांगितले. दावोसला जाणाऱ्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह १० जणांचा समावेश आहे. तसेच केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात आठ जणांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in