नरोडा हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता ; भाजप नेते कोडनानी-बाबू बजरंगीसह ६९ आरोपींची सुटका

अहमदाबादमधील विशेष न्यायालयाने पुराव्यांअभावी गुरुवारी या सर्व आरोपींना मुक्त केले
नरोडा हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता ; भाजप नेते कोडनानी-बाबू बजरंगीसह ६९ आरोपींची सुटका

गुजरात दंगलीतील बिल्किस बानो बलात्कार व हत्याकांड प्रकरणातील ११ आरोपींची शिक्षा पूर्ण होण्याआधीच त्यांना सोडण्यात आल्याच्या प्रकरणावरून देशभरात बराच गदारोळ सुरू असतानाच आता नरोडा पाटिया हत्याकांडप्रकरणी गुजरातचे माजी मंत्री आणि भाजप नेत्या माया कोडनानी, बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी आणि विहिंप नेते जयदीप पटेल यांच्यासह सर्व ६९ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अहमदाबादमधील विशेष न्यायालयाने पुराव्यांअभावी गुरुवारी या सर्व आरोपींना मुक्त केले.

२८ फेब्रुवारी २००२ रोजी अहमदाबादजवळील नरोडामध्ये झालेल्या धार्मिक हिंसाचारात ११ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात भाजप नेत्या माया कोडनानी, बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी व विहिंप नेते जयदीप पटेल यांच्यासह ८६ जणांविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

विशेष न्यायमूर्ती एस.के. बक्षींच्या न्यायालयाने १६ एप्रिल रोजी प्रकरणाच्या सुनावणीची शेवटची तारीख २० एप्रिल निश्चित केली होती. त्यांनी आरोपींना न्यायालयात हजार होण्याचे निर्देशही दिले होते. सध्या सर्व आरोपी जामिनावर आहेत. २०१० मध्ये सुरू झालेल्या खटल्यादरम्यान तक्रार आणि बचाव पक्षाकडून १८७ साक्षीदार आणि ५७ प्रत्यक्षदर्शींची पडताळणी करण्यात आली. सुमारे १३ वर्षे चाललेल्या या केसमध्ये सहा न्यायाधीशांनी सातत्याने प्रकरणावर सुनावणी घेतली.

हायकोर्टाकडून कोडनानींची मुक्तता

२००२ मधील दंगलीच्या आणखी एका प्रकरणात हायकोर्टानेही कोडनानींना मुक्त केले आहे. बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगींची शिक्षा जन्मठेपेवरून २१ वर्षे करण्यात आली होती. या प्रकरणात तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही माया कोडनानींच्या बचावासाठी कोर्टात साक्षीदार म्हणून हजर झाले होते. अमित शहांनी माया कोडनानींच्या बाजूने साक्ष दिली होती की, पोलिस त्यांना आणि मायांना सुरक्षित स्थळी घेऊन गेले होते, कारण संतप्त जमावाने रुग्णालयाला घेरले होते.

logo
marathi.freepressjournal.in