
दोन वेगवेगळ्या कारवाईत चार बालमजुर कामगारांची शिवाजीनगर आणि आरएके मार्ग पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी सलीम जब्बार खान आणि मेहताब रहिमतअली खान या दोन मालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. गोवंडी आणि शिवडीत टोपी बनविण्याच्या कारखान्यासह एका कॅटरर्स कार्यालयात ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातील एका टोपी कारखान्यात शिवाजीनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने मंगळवारी दुपारी छापा टाकून तीन अल्पवयीन मुलांची सुटका केली. दुसऱ्या कारवाईत मेहताब खान याच्याकडे कॅटरर्ससाठी काही अल्पवयीन मुले काम करत असल्याची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी तिथे छापा टाकून एका चौदा वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले. या चारही मुलांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.