अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर सातत्याने आरोप होत असतानाच अमेरिकेतील न्यूयॉर्क फेडरल कोर्टातील सुनावणीत सरकारी वकिलांनी त्यांच्यावर सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केल्याने खळबळ माजली आहे.
गौतम अदानी
गौतम अदानी
Published on

न्यूयॉर्क/नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर सातत्याने आरोप होत असतानाच अमेरिकेतील न्यूयॉर्क फेडरल कोर्टातील सुनावणीत सरकारी वकिलांनी त्यांच्यावर सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान, गाैतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर यांच्याविरुद्ध अमेरिकेत अटक वॉरण्ट जारी करण्यात आल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर यांच्यासह अन्य सात जणांनी सौरउर्जा वितरित करण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी भारतामधील सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार २९ कोटी रुपयांची (२६५ दशलक्ष डॉलर) लाच दिल्याचा आरोप अमेरिकेमधील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी केला आहे. ‘अॅझ्युअर पॉवर’ या दिल्लीस्थित मुख्यालय असलेल्या कंपनीचाही या लाच प्रकरणात सहभाग असल्याचे म्हटले आहे.

न्यूयॉर्कच्या इस्टर्न डिस्ट्रिक्ट यूएस ॲटर्नी कार्यालयाने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. यूएस अतिरिक्त सहाय्यक अॅटर्नी जनरल लिसा मिलर यांनी सांगितले की, भारतामधील सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांहून अधिक लाच देणे, गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटे बोलणे आणि त्यामधून अब्जावधी रुपये गोळा करणे आदी आरोप गौतम अदानी आणि इतरांवर ठेवण्यात आले आहेत.

अदानी आणि अदानी ग्रीन एनर्जीमधील कार्यकारी अधिकारी आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत जैन यांनी कर्जदार आणि गुंतवणूकदार यांच्यापासून भ्रष्टाचार लपवून ठवला आणि तीन अब्ज डॉलरपेक्षा अधिक कर्ज आणि रोखे गोळा केले, असेही अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी म्हटले आहे. गौतम अदानी यांच्यासह सागर अदानी, विनीत जैन, रणजित गुप्ता, रूपेश अग्रवाल, सिरिल कॅबनेस, सौरभ अग्रवाल आणि दीपक मल्होत्रा यांच्यावरही फसवणूक व लाचखोरीचे आरोप करण्यात आले आहेत.

सांकेतिक नावांचा वापर

गौतम अदानी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानुसार, या प्रकरणात सामील असलेल्यांनी गौतम अदानी यांना 'न्युमेरो युनो' आणि 'द बिग मॅन' या सांकेतिक नावांनी खासगीरित्या संबोधले होते. तर लाच देण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी सागर अदानी यांनी आपला भ्रमणध्वनी वापरला होत. भारतीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने ऊर्जानिर्मिती आणि पुरवठा क्षेत्रांतील कंत्राटे मिळवणे हे उद्दिष्ट होते, असे आरोपपत्रात नमूद आहे. ही कंत्राटे मिळवून पुढील २० वर्षांमध्ये या डीलद्वारे दोन अब्ज डॉलरहून अधिक नफा मिळवण्याचीही योजना होती.

अमेरिकेतही चौकशी सुरू

अदानी आणि त्यांच्या सात अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीप्रकरणी अमेरिकेतील न्याय विभागाने बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. भारतीय अधिकाऱ्यांना जवळपास २५ कोटी डॉलरची (जवळपास २००० कोटी रुपये) लाच देण्याची योजना आखून, त्या बदल्यात ऊर्जा क्षेत्रातील कंत्राटे मिळवणे, त्यासाठी अमेरिकी कंपन्यांकडून वित्तपुरवठा मिळवणे आणि याविषयी (अमेरिकेतील) गुंतवणूकदारांना अंधारात ठेवणे असे प्रमुख आरोप ठेवण्यात आले आहेत. अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डानेही अदानी समूहाच्या तेथील कंपन्यांच्या समभागांच्या उलाढालीसंदर्भात चौकशी सुरू केली आहे.

भारतीय अधिकाऱ्यांची नावे नाहीत

भारतीय अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत पण त्यांचा संदर्भ वारंवार देण्यात आला आहे. तसेच, सौरऊर्जा क्षेत्रातील एका संस्थेचा संदर्भही देण्यात आला आहे. सौरऊर्जा क्षेत्रावर भारत सरकारने विशेष भर दिला असून, या प्रकारच्या ऊर्जानिर्मिती आणि वहन प्रकल्पांचे धोरण आखले जात आहे. संबंधित संस्था ही राज्यांतील वीजनिर्मिती कंपन्या आणि अदानींसारख्या खासगी कंपन्यांमध्ये मध्यस्थाची जबाबदारी पार पाडते.

अमेरिकी तपास यंत्रणांचा संबंध

गेल्या चार वर्षांत अदानी समूहाने परकीय गुंतवणूकदारांच्या माध्यमातून जवळपास २ अब्ज डॉलरची भांडवल उभारणी केली आहे. लाचखोरी प्रकरणाची चौकशी सुरू असताना ही माहिती गुंतवणूकदारांपासून आणि वित्त पुरवठादारांपासून दडवल्याचा आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने केला आहे. अनेक गुंतवणूकदार अमेरिकी किंवा अमेरिकेत नोंदणी झालेले असल्यामुळे अमेरिकी तपास यंत्रणांचे लक्ष या प्रकरणाकडे वळले. यासंबंधी परस्पर संज्ञापन, संपर्काचा सखोल अभ्यास करून तपास यंत्रणांनी आरोपपत्र दाखल केले. महाराष्ट्रात धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापलेले असताना, तसेच केंद्रातील भाजप नेत्यांचे अदानींशी असलेले सख्य पाहता, विरोधकांना केंद्र सरकारवर आरोप करण्यासाठी आणखी एक मुद्दा मिळाला आहे.

आंध्र, ओदिशाकडून विजेची खरेदी

अदानी यांनी २०२१ मध्ये आंध्र प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती त्यानंतर राज्य सरकारने सात हजार मेगावॅट ऊर्जा खरेदी करण्याचे मान्य केले होते. आंध्र प्रदेशातील अधिकाऱ्यांना २५ लाख रुपये प्रतिमेगावॅट दराने एकूण १,७५० कोटी रुपये सात हजार मेगावॅटसाठी देण्यात आले होते. ओदिशानेही त्याच पद्धतीने ५०० मेगावॅट ऊर्जा खरेदी केली होती. आंध्र प्रदेशात जवळपास २०० दशलक्ष डॉलरची लाच देण्यात आल्याचे न्यायालयातील दस्तावरून दिसून येत आहे.

अदानी समूह कायद्यांना बांधील

अदानी समूह कायद्याचे पालन करण्यासाठी बांधील असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अदानी समूह कायमच व्यवस्थापनाच्या सर्वोच्च तत्त्वांचे पालन करत आला आहे. त्याशिवाय, कारभारात पारदर्शकता आणि कंपनीच्या सर्वच विभागात नियमांचे पालन या बाबी अदानी समूहासाठी महत्त्वाच्या आहेत. आम्ही आमच्या भागधारकांना, भागीदारांना आणि कर्मचाऱ्यांना हा विश्वास देऊ इच्छितो की, अदानी समूह हा कायद्याचे पालन करणारा समूह असून सर्व कायद्यांचा आदर राखतो, असेही निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे.

अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार

संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून त्यामध्ये हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे ते म्हणाले. संपूर्ण विरोधी पक्ष या प्रश्नावर एक असून तो प्रश्न संयुक्तपणे सभागृहात उपस्थित केला जाईल, असेही गांधी म्हणाले. मोदी यांची विश्वासार्हता आता संपुष्टात आली आहे. अदानी आणि मोदी एकच असल्याचे देशाला समजले आहे, आम्ही प्रत्येकाला उघडे पाडू आणि हे जाळेही उद्ध्वस्त करून, माधवी पुरी-बूच हे पहिले उदाहरणा आहे, असेही गांधी म्हणाले.

देश अदानींच्या कब्जात

भारत अदानींच्या कब्जात आहे, अदानीचे भारतावर नियंत्रण आहे, आम्ही त्यांची गय करणार नाही, आम्ही सावधपणे काम करू आणि अखेरीस हे जाळे उद्ध्वस्त करू. हे राजकीय-आर्थिक-नोकरशाहीचे जाळे आहे आणि त्याने देशातील राजकीय यंत्रणा पैशाने काबीज केली आहे, तर दुसरीकडे ते नफ्यासाठी काम करीत आहेत आणि हे देशासाठी नकारात्मक आहे, असेही गांधी म्हणाले.

अदानी समूहाकडून आरोपांचे खंडन

दरम्यान, अमेरिकेतून करण्यात आलेल्या आरोपांबाबत अदानी समूहाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. अमेरिकेच्या विधी विभागाकडून अदानी ग्रीन्सच्या संचालकांवर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून आम्ही ते सर्व आरोप फेटाळत आहोत, असे या निवेदनात प्रथमच नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेच्या विधि विभागानेच नमूद केल्याप्रमाणे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे तोपर्यंत फक्त आरोप ठरतात, जोपर्यंत ते सिद्ध होत नाहीत. तोपर्यंत संबंधित आरोपी हा निर्दोषच असतो. या प्रकरणात आम्ही शक्य त्या सर्व कायदेशीर बाबींचा विचार करत आहोत, असेही या निवेदनात अदानी समूहाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तत्काळ अटक करा - राहुल

अमेरिकेने अदानी यांच्यावर लाचखोरीचे आरोप करताच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी अदानी यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. अदानी समूहाच्या व्यवहारांची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करण्याची मागणी कायम असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे अदानी यांना संरक्षण असल्याने देशात त्यांना अटक होणार नाही अथवा तपासही केला जाणार नाही, असेही ते म्हणाले.

भाजपचे काँग्रेसला प्रत्युत्तर

अदानी प्रकरणावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुरुवारी जोरदार हल्ला चढविला, त्याला भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष २००२ पासून आपल्या नेत्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे, अमेरिकेतील न्यायालयात ज्या चार राज्यांची नावे आली आहेत त्यापैकी एकाही राज्यात भाजपचे सरकार नाही, असेही पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. राहुल, सोनिया आणि काँग्रेस पक्ष २००२ पासून मोदी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळालेले नाही, असे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे.

अदानींसोबतचा करार केनियाने केला रद्द

अदानी समूहाला मिळणारे केनियाच्या मुख्य विमानतळाचे प्रस्तावित कंत्राट केनिया सरकारने रद्द केले आहे. केनियाचे अध्यक्ष विल्यम रुतो यांनी याबाबतची घोषणा केली. अमेरिकेत अदानी समूहाबाबत लाचखोरीचे आरोप झाले. तसेच केनियाचे अध्यक्ष रुतो यांनी खासगी-सरकारी भागीदारीतून उभारला जाणारा प्रस्तावित ३० वर्षांचा वीज वितरण करारही रद्द केल्याचे जाहीर केले. हा करार ७३६ दशलक्ष डॉलरचा होता.

अदानींवरील आरोपामुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ४२३ अंकांनी गडगडला निफ्टी १६९ अंकांनी घसरला

मुंबई : अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर लाचखोरी आणि फसवणूक केल्याप्रकरणी अमेरिकेत आरोप झाल्यानंतर गुरुवारी अदानी समूहाच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाल्याने भारतीय शेअर बाजारातील निर्देशांक घसरले. याशिवाय, विदेशी गुंतवणूक संस्थांकडून निधी काढून घेणे सुरूच असल्याने आणि आशियाई, युरोपियन बाजारातील कमकुवत ट्रेंडनेही नकारात्मक वातावरण होण्यास हातभार लागला.

बीएसई सेन्सेक्स ४२२.५९ अंक किंवा ०.५४ टक्क्यांनी घसरून ७७,१५५.७९ वर बंद झाला. दिवसभरात तो ७७५.६५ अंक किंवा ०.९९ टक्क्यांनी घसरून ७६,८०२.७३ या किमान पातळीवर वर आला होता. बीएसईवर तब्बल २,७३६ समभाग घसरले, तर १,२३७ वधारले आणि ९२ मध्ये बदल झाला नाही. अशाच प्रकारे एनएसई निफ्टी १६८.६० अंकांनी किंवा ०.७२ टक्क्यांनी घसरून २३,३४९.९० वर आला.

रशिया-युक्रेन संघर्षात वाढलेल्या तणावामुळे आणि वाढत्या आण्विक चिंतेमुळे देशांतर्गत बाजाराला नव्याने दबावाचा सामना करावा लागला. शिवाय, अमेरिकेतील अदानी प्रकरणाने बाजाराच्या संकटात आणखी भर पडली.

एफआयआयकडून होत असलेल्या विक्रीमुळे मंदीची चिन्हे दिसत असली तरी, मंगळवारी बाजार पुन्हा वाढला होता. बुधवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे शेअर बाजार बंद होते. बाजारात विशेषत: वित्तीय क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला. जागतिक आणि देशांतर्गत राजकीय समस्या स्थिर असताना आम्हाला ट्रेंडमध्ये सुधारणा अपेक्षित आहे, असे विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस म्हणाले.

सेन्सेक्सवर्गवारी स्टेट बँक ऑफ इंडिया, एनटीपीसी, आयटीसी, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह हे देखील घसरले. याउलट, पॉवर ग्रीड, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि ॲक्सिस बँक यांचे समभाग वधारले.

बीएसई स्मॉलकॅप ०.६७ टक्क्यांनी घसरला आणि मिडकॅप निर्देशांक ०.३७ टक्क्यांनी घसरला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सेवा ४.१४ टक्के, युटिलिटी ३.१६ टक्के, कमोडिटीज १.५५ टक्के, तेल आणि वायू १.४५ टक्के, ऊर्जा १.३४ टक्के आणि ऑटो ०.९१ टक्के घसरले. दुसरीकडे, हेल्थकेअर, आयटी, रिॲल्टी आणि टेकमध्ये वाढ झाली.

आशियाई बाजारांमध्ये, सेऊल, टोकियो आणि हाँगकाँग घसरले तर शांघाय उच्च पातळीवर बंद झाले. युरोपीय बाजार दुपारपर्यंत नकारात्मक क्षेत्रात व्यवहार करत होते. अमेरिकन बाजार बहुतांशी सकारात्मक बंद झाले.

जागतिक तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.१३ टक्क्यांनी वाढून ७३.७१ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले.

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी ३,४११.७३ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री झाली, असे एक्स्चेंजची आकडेवारी सांगते.

उद्या अमेरिका, युरोप आणि भारताच्या नोव्हेंबर महिन्याच्या उत्पादन आणि सेवा पीएमआय जाहीर होणार असल्याने त्याचा परिणाम शुकवारी भारतीय शेअर बाजारात होण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात, जागतिक भौगोलिक-राजकीय चिंता, एफआयआयच्या सातत्याने होणाऱ्या विक्रीमुळे बाजार अस्थिर राहण्याची आम्हाला अपेक्षा आहे.

गुंतवणूकदारांचे ५.२७ लाख कोटींचे नुकसान

अदानी समूहाच्या समभागात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारातील गुरुवारी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ५.२७ लाख कोटी रुपयांची घसरण झाली. बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल रु. ५,२७,७६७.५७ कोटींनी घसरून रु. ४,२५,३८,९०८.०१ कोटी (५.०४ ट्रिलियन अमेरिकन डॉलर) झाले.

logo
marathi.freepressjournal.in