चांद्रयान -३ चंद्रावर पाठवल्यानंतर आता इस्रोने काही दिवसांपूर्वी 'आदित्य एल-1' हा उपग्रह सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवला होता. सध्या 'आदित्य एल-1' पृथ्वीच्या कक्षेत आहे. याठिकाणाहून त्याने पृथ्वी आणि चंद्राचे काही फोटो टिपले आहेत. सोबतच त्याने सेल्फी देखील क्लिक केला आहे. इस्रोने त्यांचा अधिकृत अकॉउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
इस्रोने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात 'आदित्य एल-1' उपग्रहाने काढलेला सेल्फी व्हिडिओ आणि पृथ्वी व चंद्राचा व्हिडिओ दिसत आहे. 'आदित्य एल-1' उपग्रहावरील VELC आणि SUIT हे दोन पेलोड देखील या सेल्फीत दिसत आहेत. 4 सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ टिपण्यात आला होता, असंही या व्हिडिओत सांगितलं आहे.
'आदित्य एल-1' ही भारताची पहिलीच सौर मोहीम आहे. 2 सप्टेंबर रोजी याचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. यात आदित्य हा उपग्रह पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर प्रस्थापित करण्यात येईल.
सध्या 'आदित्य एल-1' उपग्रह हा पृथ्वीच्या बाहेरील कक्षेत आहे. 18 सप्टेंबर पर्यंत तो पृथ्वीभोवती एक फेरी पुर्ण करणा आहे. यानंतर तो पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून एल-1 पॉइंटच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू करेल. यासाठी त्याला सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. 'एल-1' हा अंतराळातील असा एक पॉइंट आहे, जिथं पृथ्वी किंवा सूर्याचं गुरुत्वाकर्षण अजिबात जाणवत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी कोणतीही ठेवलेली वस्तू स्थिर राहते. यामुळेच या पॉइंटची निवड करण्यात आली आहे.