आदित्य एल-१ यानाचा प्रवास अंतिम टप्प्यात;७ जानेवारीला लाग्रान्ज-१ बिंदूजवळ पोहोचण्याची शक्यता

हा प्रवास आता अंतिम टप्प्यात आला असून ७ जानेवारीपर्यंत आदित्य एल-१ यानाला लाग्रान्ज-१ बिंदूच्या जवळ स्थापित करण्यात येईल
आदित्य एल-१ यानाचा प्रवास अंतिम टप्प्यात;७ जानेवारीला लाग्रान्ज-१ बिंदूजवळ पोहोचण्याची शक्यता

तिरुवनंतपुरम : भारताचे आदित्य एल-१ सौरयान त्याच्या प्रवासाच्या अंतिम टप्प्यात असून ७ जानेवारी २०२४ पर्यंत ते अंतराळातील लाग्रान्ज-१ (एल-१) बिंदूपर्यंत पोहचण्याची अपेक्षा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) व्यक्त केली.

भारताने पहिले साऊंडिंग रॉकेट प्रक्षेपित करण्याच्या घटनेला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी आदित्य एल-१ यानाच्या प्रवासाबद्दल आशावाद व्यक्त केला. भारताने चांद्रयान-३ मोहीम यशस्वी केल्यानंतर सौरमोहीम हाती घेतली. त्या अंतर्गत २ सप्टेंबर रोजी आदित्य एल-१ या यानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे यान अंतराळातील लाग्रान्ज-१ या बिंदूजवळ जाऊन तेथून सूर्याची निरीक्षणे करणार आहे. त्याचा सूर्याच्या अभ्यासासाठी मोठा उपयोग होईल. हा बिंदू पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर आहे. तेथपर्यंत पोहोचण्यास आदित्य एल-१ यानाला १२५ दिवसांचा कालावधी लागणार होता. हा प्रवास आता अंतिम टप्प्यात आला असून ७ जानेवारीपर्यंत आदित्य एल-१ यानाला लाग्रान्ज-१ बिंदूच्या जवळ स्थापित करण्यात येईल, असे एस. सोमनाथ यांनी शनिवारी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in