२ सप्टेंबरपासून आदित्य-एल-१ सूर्यमोहिमेवर!

अमेरिकच्या नासाने सर्वाधिक मोहिमा पाठवल्या आहेत
२ सप्टेंबरपासून आदित्य-एल-१ सूर्यमोहिमेवर!

बंगळुरू : चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३ च्या ऐतिहासिक लँडिंगनंतर आता भारतीय अंतराळ संस्था 'इस्रो'ने आपला मोर्चा सूर्याच्या मोहिमेकडे वळवला आहे. बहुप्रतीक्षित आदित्य-एल-१ मोहिमेला २ सप्टेंबरपासून प्रारंभ करणार आहे. याबाबतची माहिती गुरुवारी स्पेस ॲप्लिकेशन सेंटर-इस्रो, अहमदाबादचे संचालक नीलेश एम. देसाई यांनी दिली. आदित्य-एल-१ पीएसएलव्ही रॉकेटद्वारे सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले जाईल.

बहुप्रतीक्षित आदित्य-एल-१ मिशनविषयी माहिती देताना इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले की, या मोहिमेसाठी पाठवण्यात येणाऱ्या यानावरील उपकरणांचे परीक्षण पूर्ण झाले. सर्व काही ठीक झाल्यास २ सप्टेंबरला हे यान रवाना केले जाईल. हे सूर्याच्या वायुमंडळातून बाहेर पडणाऱ्या किरणांचे विश्लेषण करणार आहे. आदित्य-एल-१ ही भारताची पहिली सौर मोहीम आहे, जी सूर्याचा अभ्यास करणारी अंतराळ-आधारित भारतीय वेधशाळा आहे. हे अंतराळयान ७ पेलोड्स घेऊन सूर्याच्या प्रकाशक्षेत्र, क्रोमोस्फियर आणि सर्वात बाहेरील थरांचे निरीक्षण करेल.

भारताची पहिली सूर्य अंतराळ मोहीम

सूर्याचा अभ्यास करणारी ही भारताची पहिली अंतराळ मोहीम असेल. आदित्य-एल-१ असे या सौर मोहिमेचे नाव आहे. सूर्याचे बारकाईने निरीक्षण करणे, त्याचे वातावरण आणि चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करणे हा त्याचा उद्देश आहे. सूर्यमालेवर होणाऱ्या परिणामांमुळे उपग्रहाची कक्षा आणि त्याचे जीवन विस्कळीत होऊ शकते. यावरूनही त्याचे महत्त्व कळू शकते. अंतराळातील वातावरण समजून घेण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण आहे. आतापर्यंत विविध देशांनी एकूण २२ सूर्य मोहिमा केल्या आहेत, ज्या देशांनी या मोहिमा पूर्ण केल्या आहेत त्यात अमेरिका, जर्मनी, युरोपियन स्पेस एजन्सी यांचा समावेश आहे. अमेरिकच्या नासाने सर्वाधिक मोहिमा पाठवल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in