
भारतीया सैन्याच्या 'मोटरसायकल रायडर डीस्प्ले टीम'ने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करत सर्वोच्च मानवी मनोरा (Human Pyramid) रचून जागतिक विक्रम केला आहे. येत्या 26 जानेवारीला आपण भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. त्या पार्श्वभूमीवर कर्तव्य पथावर वेगवेगळ्या परेड सुरू आहेत. भारतीय सैन्याच्या मोटरसायकल रायडर डिस्पले टीमने चालत्या मोटरसायकलवर आतापर्यंतचा सर्वात उंच ह्युमन पिरॅमिड साकार करून नवा जागतिक विक्रम केला आहे. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
भारतीय सैन्याच्या या टीमने आज (सोमवार, 20) सात चालत्या मोटारसायकलवर 40 जणांनी मिळून 20.4 फूट इतका उंच पिरॅमिड रचत कर्तव्यपथवर विजय चौक ते इंडिया गेट, असे दोन किलोमीटरचे अंतर कापले. भारतीय सैन्याची मोटारसायकल रायडर डिस्प्ले टीम आपल्या साहसी प्रात्यक्षिकांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी नेहमीच प्रशंसा प्राप्त केली आहे. या विक्रमासह या टीमने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये 33 विक्रम प्रस्थापित केले आहे.
आर्म ऑफ कॉर्प्सचे प्रमुख लेफ्टनंट जनरल के. वी. कुमार यांच्यासह टीमने इंडिया चौक यैथे तिरंगा फडकवत 'बंधुत्वा'चा संदेश दिला. तसेच या जबरदस्त पराक्रमाकरिता आपल्या संघाचे मनोबल वाढवण्यासाठी कुमार हे त्यांना प्रोत्साहित करत होते.
1935 मध्ये अस्तित्वात आल्यापासून या धाडसी टीमने आतापर्यंत अशा प्रकारची 1600 पेक्षा अधिक प्रात्यक्षिके भारत आणि भारताबाहेर सादर केली आहेत. प्रजासत्ताक दिन परेड, सैन्य दिन परेड, अशा प्रतिष्ठित सोहळ्याप्रसंगी अशा प्रकारची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून प्रेक्षकांना भारावून टाकतात. भारतीय सैन्याची विशेष कौशल्ये सादर करत त्यांची निष्ठा प्रेरणादायी ठरते.
दरम्यान, राष्ट्रीय महत्त्वाच्या घटनांमध्ये 'जन भागिदारी' वाढवण्याच्या उद्देशाच्या अनुषंगाने, 26 जानेवारी,2025 रोजी कर्तव्य पथ,नवी दिल्ली येथे 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे साक्षीदार होण्यासाठी 10,000 विशेष पाहुण्यांना आमंत्रित केले आहे. यामध्ये वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असलेल्या या 'स्वर्णिम भारताच्या शिल्पकारां'मध्ये विविध क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आणि ज्यांनी शासनाच्या योजनांचा उत्तम वापर केला आहे त्यांचा समावेश आहे.